मनाला प्रसन्न करून घेतले की सर्व सिद्धी प्राप्त होतात
अध्याय आठवा
भगवंत म्हणाले, जे मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण करून निर्विचार होतात त्यांनी इंद्रियांना त्यांच्या ताब्यात ठेवलेले असते. त्यामुळे त्यांचे मन बाह्य विषयाकडे बिलकुल लक्ष देत नाही. ते ईश्वरस्मरणात सदैव दंग असतात. त्यांच्या हातून अधियज्ञ घडत असतो. ह्या अधियज्ञाची सुरवात मनाला अंतर्मुख करण्यापासून होते.
मन अंतर्मुख झाल्यावर सर्व इंद्रियांचे नियमन करून हृदयाचे ठिकाणी मन एकाग्र करून, प्राण मस्तकामध्ये ठेऊन योगाचरणामध्ये स्थित व्हावे ह्या अर्थाचा
लावूनि सगळी द्वारे कोंडूनि मन
अंतरी । मस्तकी प्राण राखूनि चढला धारणेवरी ।।12।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, इंद्रियांवर संयम करून त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी निग्रहाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. अर्थात हे सर्व मनाची समजूत घालून गोडीगुलाबीने करावे लागते. असे केल्यास आपले कायमचे भले होणार आहे हे त्याला पटवून द्यावे लागते. समोर दिसणाऱ्या गोष्टीपेक्षा इंद्रियनिग्रह करून जे मिळणार आहे ते खूपच मौल्यवान आहे हे त्याच्या लक्षात आणून द्यावे म्हणजे ते ताळ्यावर येईल आणि बाह्य विषयातून लक्ष काढून घेईल.
तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून मनाला प्रसन्न करून घ्या असा सल्ला देताना म्हणतात,
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे
कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।1।। मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ।।2।। मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणांस । गति अथवा अधोगति ।।3।। साधक वाचक पंडित । श्रोते
वत्तें ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका ह्मणे दुसरें ।।4।।
मनाला प्रसन्न करून घेतले की, सर्व सिद्धी प्राप्त होतात. मन ही आपली माउली आहे. ज्याप्रमाणे आई मुलाचे सर्व हट्ट पुरवते त्याप्रमाणे मनमाउली आपल्या सर्व इच्छा पुरवते. इतरवेळी ते आपल्यावर हुकुमत गाजवत असते पण त्याची समजूत पटली की, जणू काही ते आपले दास असल्यासारखे वागते. म्हणून मनासारखे दुसरे दैवत नाही.
माउली पुढे म्हणतात, मनाची समजूत घालून त्याला बाह्य विषयापासून परावृत्त केले की, ज्याप्रमाणे हात-पाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही, त्याप्रमाणे मन समजूतदारपणे अंत:करणात स्वस्थ राहील. मन स्थिर झाल्यावर ओंकाराचे चिंतन केले असता प्राण प्रणवरूप होतो. मग त्याला सुषुम्ना नाडीच्या मार्गाने महाआकाशापर्यंत न्यावे.
पुढील श्लोकात भगवंत सांगतात, ॐ या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करत असता व माझे स्मरण करत जो देहाचा त्याग करतो. तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला जातो.
मुखे ?-ब्रह्म उच्चारी अंतरी मज
आठवी । ह्यापरी देह ठेवूनि जाय थोर गतीस तो ।।13।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, योगाचरणी स्थित झालेला योगी अंत्यसमयी ओंकाराचे स्मरण करत असतो. एकाक्षणी हे ओंकाराचे स्मरण थांबते आणि श्वास रोखला जातो. अशावेळी फक्त पूर्णब्रह्माचे अस्तित्व राहते.
क्रमश: