ब्रह्मसुखाची गोडी लागली की, बाह्यसुखे बेचव वाटू लागतात
अध्याय पाचवा
माउली म्हणतात, योगी ब्रह्मसुखाशी एकरूप होऊन ते अनुभवत असतो. त्यामुळे मी ब्रह्मसुख अनुभवतोय असा विचार त्याच्या मनात येत नाही. सामान्य मनुष्य विषयसुखाचा साक्षीदार होऊन सुखाचा अनुभव घेत असतो. त्यामुळे मी अमुक अमुक विषयसुख अनुभवत आहे ही जाणीव त्याला असते. ब्रह्मसुखाचा अनुभव घेताना योग्याला स्वत:चा विसर पडतो. त्यामुळे ते त्याला शब्दात सांगता येत नाही. तो ब्रह्मसुखाला गाढ आलिंगन देऊन बसलेला असतो. पाण्यात पाणी मिसळले तर आधीचे पाणी कोणते आणि नंतर मिसळलेले कोणते हे सांगता येत नाही. त्याप्रमाणे तो परब्रह्मात मिसळून गेलेला असल्याने त्याचे स्वत:चे अस्तित्व नष्ट झालेले असते. मीठ पाण्यात विरघळले की, त्याला स्वत:चे अस्तित्व रहात नाही त्याप्रमाणे योग्याने त्याच्यातील अहंकार स्वत:मध्ये विरघळवून टाकलेला असल्याने त्याने अहंकाराचे अस्तित्व नष्ट केलेले असते. त्याच्या स्वभावात बदल होऊन तो अहंकारविरहीत झालेला असतो. आकाश आणि वायू एकमेकात पूर्णपणे मिसळून गेलेले असतात त्याप्रमाणे योगी परब्रह्मसुखाशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे त्याला परब्रह्मसुखापासून वेगळे करता येत नाही. हे बाहेरून लक्षात येत नाही कारण मी ब्रह्मसुखाशी एकरूप झालेलो आहे हे सांगायला तो मी पणाने उरलेलाच नसतो. त्याचा स्वभाव इतरांच्यापेक्षा वेगळा आहे हे त्याच्या वागणुकीवरून समजते. तो त्याला प्राप्त असलेल्या सिद्धी तो लोककल्याणकारी कार्यासाठी वापरत असतो परंतु स्वत:चे अस्तित्व विसरलेला असल्याने हे मी केले असे न म्हणता हे देवाने केले असे तो लोकांना सांगत असतो. पुढील श्लोकात भगवंत सांगतात की, आत्मस्वरुपात विरघळून गेलेला योगी स्वत:च आत्मस्वरूप झालेला असल्याने ह्यालोकीच त्याला मुक्ती प्राप्त होते.
पुढील श्लोकात भगवंत सांगतात की, प्रकाश स्थिरता सौख्य ह्या गोष्टी बाहेरून मिळवण्याच्या नसून त्या, आपल्या अंतरातच आहेत हे ओळखलेला योगी आत्मस्वरुपात विरघळून जाऊन स्वत:च आत्मस्वरूप झालेला असल्याने ह्यालोकीच मुक्ती मिळवतो.
प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया । ब्रम्ह होऊनि तो योगी ब्रम्ह-निर्वाण मेळवी ।। 24 ।।
सामान्य माणसाचे सुख पैसा किती मिळवला, घरे किती बांधली, गाड्या किती घेतल्या ह्यावर अवलंबून असते. अशा माणसाला समाजात मान मिळतो. त्याचा अहं सुखावतो. त्याला वाटते की, आपण फार मोठे कर्तृत्व गाजवले आहे परंतु हे सुख त्या वस्तूच्या प्राप्तीवर अवलंबून असल्याने ते कायम मिळतेच असे नाही. वस्तू जुनी झाली की, त्यातले नाविन्य ओसरल्यामुळे पुढील वस्तू घ्यायचे वेध लागतात आणि त्या नादात आधीची वस्तू मिळाल्याच्या सुखाला ओहोटी कधी लागली ते कळत नाही. आत्मसुखाची गोष्ट मात्र तशी नाही. त्याचा झरा आपल्या अंतरातच असल्याने ते सतत सारख्या प्रमाणात मिळत राहते. एकदा त्याची गोडी लागली की, बाह्य गोष्टीतून अधूनमधून मिळणारी सुखे बेचव वाटू लागतात. म्हणून माउली श्लोकाच्या विवरणात म्हणतात, ह्या सांगण्यासवरण्याच्या गोष्टी नसून ज्याच्या त्याने अनुभवण्याच्या गोष्टी आहेत.
क्रमश: