For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुन्हा एकदा सेंट फ्रान्सिस झेवियर

06:53 AM Apr 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुन्हा एकदा सेंट फ्रान्सिस झेवियर
Advertisement

देव, धर्म ही अफुची गोळी केवळ झिंग आणत नाही तर एकमेकांचे जीव घेण्यासही प्रवृत्त करते. खरेतर आमचा देव अन् तुमचा देव, असे काहीच नसते. सर्वांचा तारणहार एकच असतो. तो कुणी पाहिलेला नसतो, तो कसा असतो, कसा दिसतो याची कल्पनाही कुणालाच नसते. खरी-खोटी अनुभूती असते. परंपरेनुसार जपल्या गेलेल्या श्रध्दा असतात. भावना गुंतलेल्या असतात किंवा अंधश्रध्दाही असतात. कधीतरी भावना दुखावतात आणि वादातून वादळे निर्माण होतात. सेंट फ्रान्सिस झेवियर हीसुध्दा अनेक श्रध्दांपैकी एक. हल्ली, या श्रध्देवरून गोव्यात धार्मिक सलोख्याला गालबोट लागण्याचे प्रकार घडू लागले आहेत.

Advertisement

शनिवारच्या त्या रात्री वास्कोत ‘सनातन धर्म रक्षा समिती’ने भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा घडवून आणला. सोहळ्याची फारशी प्रसिध्दीही झाली नव्हती. त्यामुळे अर्ध्याअधिक खुर्च्या रिकाम्याच होत्या. लाखोंचा खर्च आणि व्यासपीठ भव्य होते मात्र सद्गुरु ब्रह्मेsशानंद स्वामी, मंत्री, आमदार आणि प्रसिध्द वक्ते काजल हिंदुस्थानी तसेच डॉ. गौतम खट्टर अशा मान्यवरांच्या व्यासपीठाला शोभेल, अशी श्रोत्यांची संख्या नव्हतीच. तरीही हा सोहळा भलताच प्रसिध्दीस पावला. कारण ठरले कट्टर हिंदुत्ववादी गौतम खट्टर यांचा विधानांमुळे. इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ते सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी काय बरळले, हे आता कुणाला सांगण्याची गरज राहिलेली नाही. त्यांचे ते बोलणे आयोजकांना खटकले. मंत्री -आमदारांनाही त्यांना रोखावे, असे वाटले. त्यांनी प्रयत्नही केला परंतु जमलेल्या श्रोत्यांपैकी काहींनी त्या वक्त्यांना टाळ्यांच्या प्रतिसादाने प्रोत्साहनच दिले. त्यानंतर ‘व्हायरल’ झालेल्या त्या भाषणाच्या व्हिडीओमुळे संताप निर्माण होणे, यात नवल नव्हते. रविवारचा दिवस निषेध, मोर्चा, पोलिस स्थानकांवरील जमाव, पोलिस तक्रारी आणि अटकेची मागणी, यातच गेला. निषेधकर्त्यांनी त्या व्यासपीठावर बसलेल्या मंत्री व आमदारांनाही अटक करण्याची मागणी केली.

उच्चशिक्षित वक्ते गौतम खट्टर आणि काजल हिंदुस्तानी यांची भाषणे आणि त्यांचे विचार काय असतात, हे जाहीर आहे मात्र ते मर्यादा सांभाळूनच बोलतील, असा भलताच विश्वास आयोजकांनी बाळगला होता. अपेक्षाभंग आणि प्रकरण अंगलट आल्याचे लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, हे संयमी गोमंतकीयांच्या दृष्टीने योग्यच होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अमर्याद वापर व्यासपीठावरील मंत्री -आमदारांनाही मारक ठरला. त्यांनाही आमचा काहीच दोष नसल्याचे स्पष्ट करून खंत व्यक्त करावी लागली. गोव्यातील जनतेने, धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बळी न पडण्याचे आवाहन करावे लागले. काँग्रेसपेक्षा अधिक ‘सेक्युलर’ बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोवा भाजपला हे प्रकरण म्हणजे नसती आफतच. त्यांचे एक मंत्री आणि दोन आमदार त्या व्यासपीठावर अडकले नसते तर एवढे दोषारोप झाले नसते. आता धार्मिक सोहळ्याच्या व्यासपीठावर चढण्यापूर्वी कदाचित भाजपच्या नेत्यांना वक्ते काय बोलतील, याची चाचपणीही करावी लागेल किंवा आयोजकांना सक्त ताकीद द्यावी लागेल.

Advertisement

आपले विचार परखडपणे मांडायलासुध्दा धैर्य लागते. असे धैर्य अनेकजण जाहीररित्या दाखवितात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याने ती मुभाच दिलेली आहे मात्र आपली मते कुणाच्या तरी भावना दुखावणारी असतील आणि सामाजिक शांततेला बाधा आणणारी असतील तर मात्र विचार करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. समाजात बाकी सगळ्या भावना बोथट झालेल्या आहेत. देव, धर्म हीच भावना आज जिवंत राहिलेली आहे. राजकारणामुळे तिला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळेच उठ-सूठ भावनांचे भांडवल होत असते. कुणी काय मानावे आणि कुणी काय मानू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न मात्र इतिहासात काय-काय घडले होते, याची जाणीव गोमंतकीयांना आहे. इतिहास उगाळून अशांतता फैलावणे योग्य होणार नाही आणि इतिहास विसरणेही योग्य नाही. याची जाणीव करून देणेही चुकीचे नाही.

साधारण दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारावरुन प्रा. सुभाष वेलिंगकर व्यक्त झाले होते. त्यावेळी गोव्यात अशीच खळबळ उडाली होती. लोक रस्त्यांवर उतरले होते. सेंट फ्रान्सिस झेविअर हा विषय जसा सन्मानाचा आणि श्रध्देचा आहे तसेच काहींसाठी टिकेचाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांचा विषयही गोव्यात काहींना आवडत नाही. या महापुरुषांची नावे ऐकताच काहींचा व्देष उफाळून येतो. त्यांचीही जीभ घसरते. त्यांच्या निषेधार्थ शिवप्रेमींना अनेकवेळा गोव्यातील अनेक पोलिस स्थानकांवर धाव घ्यावी लागलेली आहे. सेंट फ्रान्सिस झेविअर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज गोव्यात ‘कळीचे मुद्दे’ ठरू लागलेत. आता त्यात भगवान परशुरामांचीही भर पडू लागली आहे. भगवान परशुरामांनी कोंकण भूमी निर्माण केली, असे मानले जाते परंतु काही लोकांमध्ये गोव्यात परशुरामांप्रति व्देषभावना

आहे.

मंत्री माविन गुदिन्हो यांनी मात्र गौतम खट्टर यांच्या भाषणानंतर भगवान परशुरामाचे गुणगान केले. त्यांनी भगवान परशुरामांना गोव्याचे जनक मानले. परशुरामांनी समुद्रात बाण सोडून गोमंतभूमी निर्माण केली, हे त्यांनी मान्य केले. या भाषणाचा व्हिडियो व्हायरल झाला तरी वादळ उठले नाही, हे सुदैव. असेच सुदैव गोव्याच्या वाट्याला सदोदित यायला हवे. देवदेवतांचा अवमान, श्रध्दाळूंची अवहेलना सर्वच देव-धर्मात होत असते. कुणी मानले किंवा नाही मानले म्हणून देवाला काही फरक पडत नसतो. श्रध्दाळूंवरही देव-धर्मावरील टीकेचा काहीच परिणाम होत नसतो. जे शेकडो वर्षांपूर्वी चालत होते, तेच आजही त्याच श्रध्देने चालत आहे. त्यामुळे कुणी देवाची थट्टा केली म्हणून एवढा गोंधळ का, असा प्रश्न उपस्थित होतो.

जाहीर व्यासपीठांवरूनच नव्हे तर समाज माध्यमांतूनही श्रध्दांचे, भावनांचे विडंबन, अवमान, निंदा, असे बरेच काही घडत असते. याची दखल घेऊन लोकांचा जमाव काहीवेळा चवताळून उठतो आणि पोलिस स्थानकावर धाव घेतो. निदान गोव्याच्या सुशिक्षित समाजाने असे चवताळणे थांबवायला हवे. अशी प्रकरणे पोलिस आपल्या कायद्यानुसार हाताळतील. त्यासाठी शहरात मोर्चे काढण्याची आणि गावागावात गोंधळ माजविण्याची आवश्यकता नाही. प्रक्षोभक भाषणांना अधिक महत्त्व देणेच, त्या वक्त्यांचा सन्मान ठरत असतो. त्यामुळे असे प्रकार वाढत जातात. भावना दुखावल्या म्हणून उठ-सूठ रस्त्यावर उतरणे, किती काळ चालणार! पुन्हा पुन्हा ईश्वर निंदा होत राहिली, श्रध्दांवर टीका-टिप्पणी होत राहिली तर श्रध्दाळूंनी पुन्हा-पुन्हा काहूर माजवत राहायचे काय? असे घडत राहिल्यास जी माणसे माणसांना भडकावायचे प्रयत्न करतात, त्यांचे प्रयत्न यशस्वी होत असतात, हे लक्षात घ्यायला हवे. प्रेषित येशू ख्रिस्तांना जिवंतपणी निंदा-नालस्ती सहन करावी लागली. क्रूर यातना सहन कराव्या लागल्या तरी त्यांनी त्या माणसांना माफच केले होते. देवावर श्रद्धा असेल तर देवाचा संदेशही पाळायला काय हरकत आहे?

अनिलकुमार शिंदे

Advertisement
Tags :

.