बुधवारी शेअर बाजार दमदार तेजीसह बंद
सेन्सेक्स 742 अंकांसह तेजीत : अदानींचे 5 समभाग चमकले
मुंबई :
भारतीय शेअर बाजारामध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणामध्ये तेजीचा कल दिसून आला बीएसई सेन्सेक्स निर्देशांक जवळपास 742 अंकांनी वधारत बंद झाला होता. 30 पैकी 27 समभाग तेजीसमवेत बंद झाले आहेत.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 742 अंकांनी वाढत 65,675 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 231 अंकांनी वाढत 19,675 अंकांवर बंद झाला. गॅब्रियल, स्टार सिमेंट, हिंदवेअर आणि चेन्नई पेट्रोलियम यांच्या समभागांनी शेअर बाजारात सर्वाधिक तेजी राखली होती. याउलट राजेश एक्सपोर्ट, फोर्टीस, नॅटको फार्मा आणि रेलिगेअर यांचे समभाग मात्र नुकसानीत होते. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही सुरुवातीपासूनच दमदार तेजी दर्शवत व्यवहार करत होते. यादरम्यान गुंतवणूकदारांच्या बाजार भांडवलात 3 लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
जगभरातील शेअर बाजारांमध्ये बुधवारी तेजीचा माहोल राहिल्याने त्याचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर सकारात्मक पाहायला मिळाला. अमेरिकेतील महागाईचे आकडे जारी झाले असून महागाई कमी झाल्याचे दिसून आले आहे. अदानी समूहातील नऊ पैकी पाच समभाग तेजी दर्शवत व्यवहार करत होते. अंबुजा सिमेंट, अदानी पॉवर आणि अदानी टोटल गॅस यांचे समभाग मात्र कमकुवत दिसून आले. टाटा मोटर्स, कामधेनू लिमिटेड, ओम इन्फ्रा, युनि पार्ट, एक्साइड इंडस्ट्रीज, महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग तेजीत होते. तर जिओ फायनान्शिअल, पटेल इंजीनियरिंग आणि देवयानी इंटरनॅशनल यांचे समभाग मात्र काहीसे घसरणीत असताना दिसले. मल्टीबॅगर उत्पन्न देणाऱ्या प्रमुख कंपन्यांचे समभाग तेजीत होते. यात डोडला डेअरी लिमिटेडचे समभाग 10 टक्के वाढले होते. गेटवे डिस्ट्री पार्क यांचे समभाग सात टक्के वाढले होते. महागाईत दिलासा मिळाल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर सकारात्मक दिसून आला. स्मॉल कॅप निर्देशांक 1.60 टक्के इतका वाढला होता. मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 3.1 लाख कोटी रुपयांनी वाढून 325.2 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जागतिक बाजारामध्ये तेजी, बाँड यिल्डमध्ये घसरण, अमेरिकेत महागाईचा उतरलेला दर या साऱ्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. दुचाकीसाठी ब्रेक शू आणि अॅडव्हान्स ब्रेकिंग सिस्टीम प्रणाली तयार करणारी आस्क ऑटोमेटीव्ह लिमिटेड यांचा समभाग शेअर बाजारामध्ये बुधवारी 8 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. कंपनीने समभागाची इशू किंमत 268-282 रुपये इतकी ठेवली होती. या तुलनेमध्ये कंपनीचा समभाग मुंबई शेअरबाजारात 304 रुपयांवर लिस्ट झाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हाच समभाग 303 रुपयांवर खुला झाला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 27 समभाग तेजीसमवेत बंद झाले आहेत.