बुधवारी भारतीय शेअरबाजारात परतली तेजी
सेन्सेक्स 299 अंकांच्या मजबुतीसोबत बंद, बँकांचे समभाग चमकले
मंगळवारी घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात बुधवारी मात्र जोरदार तेजी परतल्याचे पहायला मिळाले. सेन्सेक्स 299 अंकांनी वाढत व निफ्टी 117 अंकांनी वाढत बंद होण्यात यशस्वी झाला. बँक निर्देशांकाने चांगली कामगिरी केली खरी पण आयटी निर्देशांकाने कमकुवत कामगिरी करत बाजारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
त. भा. वृत्तसंस्था
मुंबई ; बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 299 अंकांनी वाढीसोबत 74828 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 117 अंकांनी वाढून 23,446 वर बंद झाला. बाजाराची सुरुवात जोरदार झाली आणि दिवसभराच्या सत्रात तेजी टिकून राहिली. बँक निफ्टी निर्देशांक 333 अंकांनी वाढत 56548 अंकांवर बंद झाला होता. दुसरीकडे आयटी निर्देशांक 248 अंकांनी नुकसानीसोबत 28334 अंकांवर बंद झाला. त्याने बाजारावर दबाव निर्माण केला होता.
मेटल आणि एफएमसीजी क्षेत्रातील वाढीमुळे निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांमध्ये वाढ झाली. त्याचप्रमाणे या मजबूत होत असलेल्या बाजारामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढला. विविध क्षेत्रातील समभागांची खरेदी गुंतवणूकदारांनी केली. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकात पाहता मेटल क्षेत्रात सर्वाधिक खरेदी दिसून आली. निफ्टी मेटल निर्देशांक लक्षणीय 2.28 टक्केची वाढ होऊन बंद झाला. निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 1.27 टक्के वाढून बंद झाला. फार्मास्युटिकल क्षेत्राचा निर्देशांकही बुधवारी फॉर्मात होता. याशिवाय ऑटो, फायनॅन्शीयल्स, इन्फ्रा, ऑईल व गॅस, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी यांचे निर्देशांकही चमक दाखवत बंद झाले. मीडिया क्षेत्रातले समभाग दबावात होते.
हे समभाग तेजीत
बुधवारी शेअरबाजारात बजाज फायनान्स, टाटा स्टील, हिंडाल्को, ग्रासिम, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले, लार्सन टुब्रो, आयटीसी, एचयुएल, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, जियो फाय., आयशर मोटर्स, श्रीराम फायनान्स, टाटा मोटर्स पीव्ही, मारुती सुझुकी, एसबीआय, इटर्नल, अॅक्सिस बँक, ओएनजीसी यांचे समभाग वधारत बंद झाले.
हे समभाग घसरणीत
दुसरीकडे इंडिगो, अदानी एंटरप्रायझेस, टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, कोल इंडिया, टायटन, ट्रेंट, एचसीएल टेक, एनटीपीसी, बीईएल, लुपिन, ज्युबिलंट फुड, सुझलॉन एनर्जी, पेटीएम यांचे समभाग दबावासह बंद झाले.