For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुष्काळाच्या दारात

06:21 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळाच्या  दारात
Advertisement

पुढील दोन-तीन दिवसात महाराष्ट्र आणि गोव्यात काही भागात तुरळक पाऊस पडणार, परंतु एकंदरीत यंदाचा पावसाळी मोसम पाहता सरासरी 15 टक्के असलेली तूट ही शेतीसाठी फार गंभीर परिणाम करणारी ठरणार आहे. महाराष्ट्रात सरासरी 15 ते 20 टक्के तूट आहे. मध्य महाराष्ट्रात 33 टक्के तर महाराष्ट्राच्या उत्तर भागात 28 टक्के आणि पश्चिम भागात सरासरी 15 टक्के एवढी तूट दाखवत आहे. ‘अल निनो’चा फटका हा संपूर्ण देशाला बसलेला आहे. हवामान खात्याने यापूर्वी कमी पावसाचा देशावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली होती. हवामान खात्यावर अनेकांचा विश्वास नसतो. हवामान खाते जेव्हा मुसळधार पाऊस पडेल असे सांगते आणि त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत नाही, अशावेळी असंख्य टीकाकार पाहिलेत! हवामान खाते ज्यावेळी पाऊस पडणार असे सांगते, त्या दिवशी पाऊस पडत नाही. हवामान खात्याचे निरीक्षण चुकीचे, असे निवेदन करून या खात्यावर अनेकदा फार मोठी टीका करीत असतात. प्रत्यक्षात हवामानामध्ये बऱ्याचवेळा अचानक बदल होत असतो. पश्चिमेकडे सरकणारे ढग अचानक वाऱ्याबरोबर आपली दिशा बदलतात आणि त्यामुळे ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार, असे भाकीत असते, त्याचठिकाणी फार कमी पाऊस पडतो. ही जरी वस्तुस्थिती असली तरीदेखील हवामान खाते दरवर्षी साधारणत: एप्रिलमध्ये आगामी मोसमातील पावसाची परिस्थिती कशी असेल, याबाबत जे भाकीत करते, ते कधीच चुकीचे ठरत नाही. मागील वर्षी हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडेल आणि संपूर्ण देशभरात मान्सून समाधानकारक राहील, असे वर्तविलेले भाकीत खरे ठरले. यंदा सर्वत्र कमी पाऊस पडेल, तर काही ठिकाणी दुष्काळ स्थिती निर्माण होईल, असे वर्तविलेले भाकीत देखील खरे ठरले. गोव्यामध्ये नेहमीच समाधानकारक पाऊस पडतो परंतु गेल्या 28 वर्षांनंतर गोव्यात प्रथमच यंदा 31 टक्के तुटीचा पाऊस दिसतो. एव्हाना गोव्यात साधारणत: 120 ते 125 इंच पावसाची नोंद व्हायची, मात्र यंदा सरासरी 81 इंच एवढा कमी पाऊस पडलेला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. हवामानातील वाढता बदल, हा एक चिंतेचा विषय बनलेला आहे. आता थोड्याच दिवसात परतीचा पाऊस सुरू होईल. 30 सप्टेंबरला मोसमी पावसाचे वर्ष संपुष्टात येईल. त्यानंतर परतीचा पाऊस होईल. त्यामध्ये थोड्या प्रमाणात पाऊस पडूनही जाईल परंतु तूट काही भरून निघणार नाही. म्हणजेच यंदा पावसाचे कमी प्रमाण असल्याने साधारणत: फेब्रुवारीपासून आपल्याला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. यंदा शेतीवर अगोदरच विपरित परिणाम झालेला आहे. कोकण आणि गोव्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात भातशेती होते, त्यातील भाताचे दाणे पोकळ निघालेले आहेत. शेतकऱ्यांचे कष्ट वाया गेले आहेत. त्याहीपेक्षा आपल्याला भविष्याची चिंता जास्त जाणवते. कोकणातील आणि गोव्यातील धरणे आता जरी भरलेली असली तरी गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने दडी मारल्यानंतर धरणातील पाण्याचे प्रमाण कमी झाले. शिवाय नव्याने पाण्याची आवक धरणामध्ये पूर्णत: बंद झाली होती. त्याचा परिणाम आपल्याकडे जो पाणीसाठा आहे, तो फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढाच आहे. माणसाला जगण्यासाठी पाण्याची फार आवश्यकता आहे. एकवेळ अन्न-धान्य हे इतर राष्ट्रांमधून आणता येईल परंतु पाणी कुठून आणायचं? हा विचार करणे आवश्यक आहे आणि आतापासूनच पाण्याचा कमीत कमी वापर कसा करता येईल, पाण्याची नासाडी कशी रोखता येईल आणि पाण्याचा योग्य प्रमाणात वापर कसा करता येईल, या संदर्भात नियोजन झाले पाहिजे. हवामान खात्याने या अगोदर सांगितल्यानुसार आणि जे भाकीत वर्तविले होते, त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबर या हिवाळी मोसमात यंदा असह्य उकाडा होणार आहे आणि हे जर खरे असेल तर त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पाण्याची नासाडी टाळणे, आता शेती-बागायतींसाठी देखील कमीत कमी पाणी वापरावे लागेल कारण पिण्याचे पाणी आपल्याकडे पाहिजे तेवढ्या प्रमाणात राहणार नाही. जागतिक पातळीवर होत असलेल्या हवामानाचा बदलता परिणाम आपल्यासाठी थोडा त्रासदायक, क्लेशदायक आणि तेवढाच अडचणीत आणणारा देखील असू शकतो. पाणी किती मौल्यवान आहे, याची जाणीव यानंतर आपल्याला होणार आहे. पाणी म्हणजे जीवन आणि माणूस पाण्याशिवाय जगू शकत नाही. वाढत्या तापमानाचा परिपाक म्हणूनच ‘अल निनो’ने जी वसुंधरेवर वक्रदृष्टी टाकलेली आहे, त्यातून आपल्याला चांगलाच धडा घ्यावा लागेल. जगात सध्या तेलावरून जागतिक युद्धे होत आहेत. भविष्यात पाण्यावरून युद्ध पेटणार, हे निश्चित. जग पुढे जाते, तंत्रज्ञान पुढे जात आहे आणि माणूस निसर्गाला आव्हान देऊ पाहत आहे. निसर्गदेखील आपल्याच मार्गाने जाणार आहे आणि निसर्गाला रोखता येत नाही. जागतिक तापमान वाढत आहे आणि त्याचे दुष्परिणाम भोगण्यासाठी आपल्याला सज्ज राहावेच लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. निसर्ग संवर्धनासाठी साऱ्यांनी एकत्रितपणे कंबर कसली पाहिजे. नाहीतर भवितव्य फार कठीण आहे. ‘अल निनो’चा प्रभाव वाढत आहे म्हणूनच मान्सूनने यंदा आपल्याला धडा शिकविलेला आहे. यातून आपण बोध घेणार आहोत का?

Advertisement

Advertisement
Tags :

.