Kolhapur News : किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत
तिसऱ्या दिवसाच्या किरणोत्सवाची झाली सांगता
कोल्हापूर :किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (मंगळवारी) मावळतीची सूर्यकिरणे करवीर निवासिनी अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंतच आणि तीही अस्पष्ट स्वरुपात पोहोचून लुप्त झाली. दुपारनंतर आकाश तयार झालेल्या ढगाळ वातावरण आणि आद्रतेचा सूर्यकिरणांच्या तिव्रतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, सायंकाळी ५ वाजून ९ मिनिटांनी सूर्यकिरणे अंबाबाई मंदिराच्या महाद्वारावर आली होती. याचवेळपासून किरणोत्सवाला प्रारंभ झाला होता. ५ वाजून १२ मिनिटांपासून ते ५ वाजून ३२ मिनिटांच्या कालावधीत सूर्यकिरणे मंदिराच्या अंतरंगातील कासव चौकात पोहोचली.
यावेळी आकाशात तयार झालेल्या ढगाळ व मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आद्रतेमुळे सूर्यकिरणांची तिव्रता केवळ ६ लक्स इतकी कमी झाली होती. हीच सूर्यकिरणे अंबाबाईच्या गाभाऱ्यात जेव्हा गेली होती तेव्हाही तर त्यांची तिव्रता अगदीच कमी झाली होती. अंबाबाईच्या चरणावर पोहोचल्या सूर्यकिरणांची तिव्रता फक्त आणि फक्त १.३ लक्स इतकी निच्चांकी झाली होती. यानंतर ५ वाजून ४५ मिनिटांनी सूर्यकिरणे अस्पष्ट स्वरुपात अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली. यानंतर लगेचच लुप्त होऊन तिसऱ्या दिवसाच्या किरणोत्सवाची सांगता झाली.