दुसऱ्यादिवशी सूर्यकिरणांचे केवळ अंबाबाईचे चरणस्पर्श
कोल्हापूर :
किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (रविवारी) मावळतीच्या सूर्यकिरणांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे केवळ चरणस्पर्शच केले. जेव्हा किरणे अंबाबाईच्या चरणावर काही सेकंद (5 वाजून 47 मिनिट) स्थिरावली होती, त्याचवेळी आकाशातील ढगांसह हवेतील आद्रता सूर्यकिरणांच्या आड आली त्यामुळे किरणे अचानक दिसेनासी झाली.
दरम्यान, सायंकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी सूर्यकिरणे सध्या उतरुन घेतलेल्या गऊड मंडपाच्या दगडीवर आली होती, तेव्हा दुसऱ्या दिवशीच्या (रविवारी) किरणोत्सवाला सुरुवात झाल्याचे गृहीत धरण्यात आले. यावेळी किरणांची तिव्रताही तब्बल 15 हजार 300 लक्स (एका स्क्वेअर मीटरच्या जागेत एका मेणबत्तीतून पडणारा प्रकाश हा एक लक्स अशा प्रमाणात मोजला जातो.) इतकी होती. गरुड मंडपाच्या दगडी बांधकामावरुन ही किरणे अंबाबाई मंदिरातील गणपती मंदिर, कासव चौक असा प्रवास करत 5 वाजून 30 मिनिटांनी पितळी उंबरठ्यावर आली. यावेळी किरणांची तिव्रता फक्त 35 लक्स इतकी खालावली होती. यानंतर पुढील 17 मिनिटात किरणे अंबाबाईच्या गाभाऱ्याचा चांदीचा उंबरठा, अंबाबाई ज्यावर उभी आहे, ते कटांजन प्रकाशमान करत अंबाबाईच्या चरणांपर्यंत पोहोचली आणि काहीच क्षणात अचानक लुप्त झाली. हवेत वाढलेले धुलीकण, 36 टक्के निर्माण झालेली आद्रता आणि ढगाळ वातावरणाचे आडवे येणे या तिन्ही कारणांमुळे सूर्यकिरणे अंबाबाईच्या चरणावऊनच गायब झाली. त्यामुळे सूर्यकिरणे रविवारी अंबाबाईच्या खांद्यापर्यंत जातील, असे बांधलेले अनुमान फोल ठरल्याचे डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले.