For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे दागिने पळविले

06:28 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे दागिने पळविले
Advertisement

अशोकनगरातील घटना : इराणी टोळीवर संशयाची सुई

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने घरासमोर झाडलोट करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने पळविल्याची घटना शनिवारी सकाळी अशोकनगर येथे घडली आहे. इराणी टोळीतील गुन्हेगार पुन्हा बेळगावात सक्रिय झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

Advertisement

शनिवार दि. 9 मार्च रोजी सकाळी 6.15 ते 6.30 यावेळेत अशोकनगर येथे ही घटना घडली आहे. लक्ष्मी बसवराज शिरसंगी (वय 45) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

सकाळी लक्ष्मी आपल्या घरासमोर झाडलोट करीत होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून दोघेजण आले. पाठीमागे बसलेल्या भामट्याने खाली उतरून लक्ष्मी यांना ‘सर किधर हैं?’ असे विचारले. अचानक कोणी तरी आपल्याला पत्ता विचारते आहे, हे लक्षात आल्यानंतर लक्ष्मी यांनी ‘तुम्ही कोणाबद्दल चौकशी करत आहात?’ असा प्रश्न विचारला.

तोपर्यंत भामट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेन हिसकावून घेतली. दोन तोळ्याहून अधिक दागिने हिसकावून घेऊन दोन्ही भामटे मोटारसायकलवरून तेथून पसार झाले. अचानक घडलेल्या या घटनेने धक्का बसूनही आरडाओरड करून लक्ष्मी यांनी भामट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुसाट वेगाने ते निघून गेले. भामट्यांचे पलायन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या परिसरात अधिक कॅमेरे नसल्यामुळे संपूर्ण घटना कैद झाली नाही. नागरिकांनी आपापल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी केले आहे.

दागिने हिसकावून घेऊन भामट्यांनी पलायन केल्यानंतर या महिलेने बोंब मारत त्यांचा पाठलाग केला. मात्र, काही क्षणात ते दोघे तेथून निघून गेले. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गापासून हे घर जवळच आहे. त्यामुळे दागिने पळविल्यानंतर भामट्यांनी महामार्गावरून पलायन केले असावे, असा संशय आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

इराणी टोळी पुन्हा सक्रिय  

यापूर्वीही माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात इराणी टोळीतील गुन्हेगारांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोळीबार करीत इराणी टोळीतील गुन्हेगारांना अटक केली होती. त्यानंतर थंडावलेल्या कारवाया पुन्हा सुरू झाल्या आहेत. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांना लक्ष्य बनविण्यात इराणी टोळीतील गुन्हेगार तरबेज आहेत. यासंबंधी गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्याशी संपर्क साधला असता महिलांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. घरासमोर सकाळी सडा-रांगोळी करताना हे गुन्हेगार येतात. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दागिने हिसकावून घेऊन पलायन करतात. या गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.