For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रतन टाटा यांच्या इच्छापत्राच्या निमित्ताने...

06:25 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
रतन टाटा यांच्या इच्छापत्राच्या निमित्ताने
Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे जीवन कार्य व त्यांच्या मृत्यूप्रमाणे त्यांच्या मरणोत्तर इच्छापत्राची चर्चा सध्या विविध संदर्भात होत आहे. यामध्ये त्यांच्या मरणोत्तर इच्छापत्रात त्यांच्या विशाल औद्योगिक-व्यावसायिक साम्राज्य, वैयक्तिक संपत्ती व मालमत्ता यांच्या विचारपूर्वक व नियोजनपूर्ण वितरण-विभागणी करतांनाच रतन टाटांनी त्यांना आयुष्यात खऱ्या अर्थाने साथ संगत देणाऱ्या सहकारी सेवकांबद्दल जाण ठेऊन जी मानवीय भावना व्यक्त केली ती अनेकार्थांनी बेजोड व अनुकरणीय ठरते.

Advertisement

नुकत्याच जाहिर झालेल्या तपशीलानुसार रतन टाटा यांच्या इच्छापत्राचा मागोवा पाहण्यासारखा ठरतो. प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार रतन टाटांनी त्यांचे इच्छापत्र सर्वप्रथम लिहिले होते ते 18 एप्रिल रोजी. त्यानंतर सुमारे पाच वर्षांनी म्हणजेच टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष झाल्यावर या इच्छापत्रात काही बदल सुधारणा केल्या गेल्या. त्यानंतर या दोन्ही इच्छापत्रांना संयुक्त स्वरुप देऊन रतन टाटा यांनी आपले अंतिम इच्छापत्र तयार केले ते 23 फेब्रुवारी 2022 रोजी व त्याचाच  तपशील आता जाहीर करण्यात आला आहे.

या इच्छापत्राचे मुख्य व स्मरणीय वैशिष्ट्या म्हणजे आपल्या इच्छापत्रानुसार आपल्या करोडोंच्या साधन संपत्तीच्या आपल्या मरणोत्तर वितरणात आपल्या जवळच्या कौटुंबिक नातेवाईकांसह आपल्यासाठी व आपल्या जवळच्या कर्मचाऱ्यांची जाणीवपूर्वक आठवण ठेवून त्यांना आपल्या मालमत्तेतील वाटा-वितरणात आवर्जून सहभागी करून घेतले. छोट्यांची जाणीवपूर्वक नोंद घेतल्याने रतन टाटांचे मोठेपण अधिकच वाढते ठरले.

Advertisement

यासंदर्भात थोडक्यात व महत्त्वाचे म्हणजे रतन टाटांनी आपल्या एकूण संपत्ती रकमेपैकी 3.5 कोटी रुपये त्यांचे कार्यालयीन कर्मचारी व वैयक्तिक घरगुती कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आवर्जून राखून ठेवले. यामध्ये रतन टाटांनी त्यांच्या वाहनाची साफ सफाई करणारे, कार्यालयीन कामकाज करणारे सहाय्यक शिपाई इ. सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश तर केलाच, त्याशिवाय या मंडळींना त्यांनी दिलेल्या कर्जाऊ उसन्या रकमेची संपूर्णपणे माफी पण दिली हे विशेष. रतन टाटांनी त्यांच्या इच्छापत्रात नमूद केल्यानुसार त्यांच्याकडे घरगुती स्वरुपाची कामे करणाऱ्या कामकऱ्यांना 15 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये या घरगुती कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीचा विचार करण्याची सूचना देण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या घरी अन्य विविध प्रकारची अल्पकालीन सेवा देणाऱ्या  कामगारांना 1 लाख रुपये मिळणार आहेत.

इच्छापत्रात नमूद केल्यानुसार रतन टाटांकडे असणाऱ्या व ते वापरत असणाऱ्या विशेष दर्जाच्या व महागड्या कपड्यांसह नित्योपयोगातील वापरत्या येण्याजोग्या वस्तू व उपकरणे गरीब व गरजू लोकांमध्ये संबंधित समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून वितरित केल्या जाणार आहेत.

रतन टाटांनी त्यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या राजन शॉ ला 1 कोटी रु. देण्याची तरतूद केली असून यामध्ये त्यांना टाटांनी दिलेल्या 51 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा समावेश आहे. याशिवाय त्यांना भोजनसेवा देणाऱ्या सुभाशिल कोनार यांना 36 लाखांच्या कर्जमाफीसह 66 लाख रुपये देण्याची तरतूद रतन टाटांनी आपल्या इच्छापत्रात व्यक्त केली आहे. यावरून रतन टाटांची त्यांच्या घरी व त्यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपल्या मरणोपरांत असणारी कणव आणि जाणीव स्पष्ट होते.

कार्यालयीन सहकाऱ्यांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास रतन टाटांनी त्यांच्या इच्छापत्रात सचिव दिलनाझ ग्लॅझर यांच्यासाठी 10 लाख लिहून ठेवले. त्यांचे विशेष सहाय्यक शंतनू नायडू यांना कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे उच्च शिक्षण घेण्यासाठी दिलेली 1 कोटी रुपयांची रक्कम माफ केली. याशिवाय रतन टाटा यांनी त्यांचा वाहन चालक असणाऱ्या राजू लिऑन यांची 18 लाख रुपयांची कर्जमाफी करून त्याशिवाय आपल्या वाहनचालकाला 15 लाख रुपये देऊ केले आहेत.

वरील रकमा व विशेषत: त्यातील कर्जमाफीच्या संदर्भात आपल्या 23 फेब्रुवारी 2022 च्या इच्छापत्रानुसार आपल्या इच्छापत्राची अंमलबजावणी करणाऱ्या विश्वस्त व विश्वासू संबंधितांना स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, त्यांच्या अंतिम इच्छांप्रमाणेच विशेषत: त्यांनी नमूद केलेल्या सहकाऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्देशांची कसोशीने अंमलबजावणी केली जावी. एवढेच नव्हे तर माझ्या सहकाऱ्यांसाठी मी प्रस्तावित केलेली कर्जमाफी ही कुठल्याही प्रकारे मेहेरबानी न समजता माझ्यातर्फे माझ्या या सहकाऱ्यांसाठी देण्यात आलेली माझी सदिच्छ भेट मात्र समजावी असे स्पष्ट निर्देश रतन टाटांनी दिले आहेत हे महत्त्वाचे.

अन्य व्यक्तींच्या स्वरुपात उल्लेखनीय बाब म्हणजे रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टमध्ये सल्लागार म्हणून काम करणाऱ्या होशी मलेसरा यांच्यासाठी 5 लाख रुपयांची तर अलिबाग येथील बंगल्याची काळजी घेणाऱ्या देवेंद्र कटामोलू यांच्यासाठी 2लाख रुपयांची तरतूद आपल्या इच्छापत्रात नमूद केली आहे. याशिवाय त्यांनी आपल्या निधी सचिव दिप्ती दिवाकरन यांना 1.5 लाख तर कार्यालयीन शिपाई म्हणून काम करणाऱ्या गोपालसिंह व पांडुरंग गुरव या उभयतांना प्रत्येकी 50,000 रु. दिले असून एक अन्य सहाय्यक सरफर्झ देशमुख यांचे 2 लाखांचे कर्ज माफ केले आहे. यावरून आपल्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येकासाठीच्या रतन टाटा यांच्या आत्मिक आपुलकीच्या भावनाच स्पष्ट होतात.

उच्च शिक्षण घेणाऱ्यांना रतन टाटा नेहमीच व वैयक्तिक स्तरावर प्रोत्साहन देत असत. त्यामुळेच रतन टाटा यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या

जॅक मिलाईट यांना इंग्लंडमधील वॉरविक बिझनेस स्कूलमधून एमबीए करण्यासाठी दिलेले 23.7 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचे निर्देश दिले आहेत. आज जॅक मिलाईट हे त्यांचा एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करून प्रेट अँड निटनेक्स या हवाई वाहतूक कंपनीत उच्च पदावर असून त्यांना आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टाटांनी दिलेला मदतीचा हात आयुष्यभराची साथ ठरली आहे.

आपल्या जमीन मालमत्तेपैकी एक तृतियांश जमीन रतन टाटांनी ताज हॉटेलच्या निवृत्त कर्मचारी मोहिनी दत्ता यांच्या नावे केली आहे. याशिवाय 85 लाख रु. सिंगापूर येथील वित्तीय संस्थेला सहयोग राशी स्वरुपात प्रदान केली व त्याचा विनियोग टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. वेंकटरमण व टाटा टेक्नॉलॉजीचे निवृत्त मुख्याधिकारी पॅट्रिक मॅक गोल्डरिक यांनी करावा, असे आपल्या इच्छापत्रात नमूद केले आहे.

रतन टाटांनी आपल्या मरणोपरांत इच्छापत्राचे सारासार व संपूर्णपणे क्रियान्वयन करण्यासाठी आपल्या ज्या नातेवाईक मित्र व सहकाऱ्यांची निवड केली, त्यामध्ये योजनापूर्वक शिरीन जिजीमॉय व दिना जिजीमॉय या भगिनी, मित्र मिहिल मिस्त्री, टाटा ट्रस्टचे विश्वस्त दारियस खंबाटा यांची निवड केली. मात्र रतन टाटांनीच दिलेल्या निर्देशानुसार त्यांच्या इच्छापत्राची अंमलबजावणी करतांना वरीलपैकी कुणी वाद वा मतभेद निर्माण केले तर त्यांचा रतन टाटांच्या संपत्तीत कुठलाही वाटा राहणार नाही हे पण स्पष्ट केले आहे.

बऱ्याच वर्षांपूर्वी शेतकरी नेते शरद जोशी यांनी आपल्या इच्छापत्रानुसार आपल्या मृत्यूनंतर त्यांच्या वाहन चालकासाठी 25 हजार रु. देण्याचे लिहून ठेवले. रतन टाटांनी अशाच उदारतेला आपल्यासाठी काम करणाऱ्या छोट्या व्यक्तीसाठी पण आपल्या इच्छापत्रात राशी प्रदान करून त्यांच्या मनाचे मोठेपण अनेकार्थांनी स्पष्ट केले आहेच. मात्र रतन टाटा यांच्या मनाचे मोठेपण प्रकर्षाने भावते ते त्यांनी आपल्याला प्रिय असणाऱ्या टिटो या कुत्र्यासाठी आवर्जुन राखून ठेवलेल्या 12 लाखांच्या तरतुदीमुळे रतन टाटांचे मोठेपण त्यांच्या मरणांती म्हणून भावते.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.