For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाशिवरात्रनिमित्त उद्या शिवमंदिरांत विविध कार्यक्रम

10:14 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाशिवरात्रनिमित्त उद्या शिवमंदिरांत विविध कार्यक्रम
Advertisement

खानापूर तालुकयातील विविध मंदिरांत महाभिषेक-पारायण कार्यक्रम : 9 रोजी आमावस्येनिमित्त महाप्रसादांचे आयोजन

Advertisement

खानापूर : तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरून उगम पावून पूर्वाभिमुख होऊन वाहणाऱ्या मलप्रभा नदीचे धार्मिक महत्त्व वेगळेच आहे. ही पूर्वाभिमुख वाहणारी नदी कुडलसंगम येथे कृष्णेत जाऊन मिळते. त्यामुळे या नदीचे वेगळ्या महत्त्वाबरोबरच धार्मिक देवदेवतांच्या सहवासाने हिचे पावित्र्य अधिकच वाढले आहे. त्यामुळे मलप्रभेच्या संपूर्ण तिरावर शिवरात्रीसारख्या धार्मिक सणाची मोठी परंपरा लाभलेली आहे. यावर्षी गुरुवार दि. 8 रोजी महाशिवरात्र असल्याने शिवरात्रनिमित्त शिव मंदिरांतून धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. दि. 9 रोजी आमावस्या असल्याने काही ठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. मलप्रभेच्या तालुक्यातून जाणाऱ्या 80 कि. मी. च्या वळणदार प्रवासात अनेक ठिकाणी पुरातन तसेच धार्मिक मंदिरे आहेत. कणकुंबी येथील माउली मंदिर, हब्बनहट्टी येथील स्वयंभू हनुमान मंदिर, असोगा येथील रामलिंगेश्वर मंदिर, खानापूर मलप्रभा घाटातील पंचमुखी महादेव मंदिर तसेच पूर्व भागातील हट्टीवळी येथील वीरभद्र मठ व तालुक्याच्या शेवटी एम. के. हुबळीनजीक असलेले गंगांबिका मंदिर हे मलप्रभा नदीच्या वैभवात भर घालणारे आहे. या सर्व मंदिरांत शिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही ठिकाणी तीन दिवस यात्रेचे स्वरुप आलेले असते. तर काही ठिकाणी आमावस्येदिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. कणकुंबी माउली मंदिरात शिवरात्री महाउत्सव दरवर्षी साजरा केला जातो. अभिषेक, महाप्रसादादी कार्यक्रम साजरे केले जातात. तब्बल दोन दिवस हा उत्सव साजरा केला जातो. माउली देवीचा पालखी सोहळा येथील रामेश्वर मंदिरापर्यंत होऊन उत्सवाची सांगता केली जाते.

हब्बनहट्टीतील स्वयंभू मारुती मंदिर

Advertisement

मलप्रभा नदीवरील जांबोटीजवळ असलेल्या हब्बनहट्टीतील स्वयंभू मारुती मंदिरातही शिवरात्र उत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरते. येथील हनुमान देवस्थानचा महिमा दिवसेंदिवस वाढत आहे.

असोगा येथील श्री रामलिंगेश्वर मंदिर

मलप्रभा नदीवर अती महत्त्वाचे श्रद्धास्थान म्हणून खानापूर शहरापासून अवघ्या तीन कि. मी. अंतरावर असलेले श्री रामलिंगेश्वर मंदिराला धार्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी बारा महिने भाविकांची गर्दी असते. परिसरात अनेक लहान, मोठी मंदिरे आहेत. नदीकाठावरील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या पर्यटनस्थळाला प्रत्येक धार्मिक सणाच्यावेळी भाविक मोठ्या संख्येने येतात. महाशिवरात्रीला दोन दिवस मोठी यात्रा भरते. नदीच्या पात्रात असलेली स्वयंभू ईश्वर लिंग तसेच मंदिराच्या काठावर वसलेले रामलिंगेश्वर देवस्थान भाविकांचे केंद्रबिंदू ठरते. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे या स्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. महाशिवारात्रीनिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रमात ऊद्राभिषेक, महापूजा यासह महाप्रसादाचे आयोजनही केले जाते. त्याचप्रमाणे खानापूर शहरातील मलप्रभा नदीघाटावरही भाविकांची अलोट गर्दी असते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मलप्रभा नदीघाट व जुना पूल परिसरात खेड्यापाड्यातील भाविक मोठ्या संख्येने वाहने घेऊन पवित्र स्नानासाठी उपस्थित राहतात. येथील घाटावर असलेल्या पंचमुखी महादेव मंदिरात तसेच घाटावर असलेल्या जोशी यांच्या पंचमुखी महादेव मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.

कुप्पटगिरी गावाजवळ नदीच्या काठावर बांधण्यात आलेल्या पुंडलिक मंदिर, व•sबैल येथे काठानजीक असलेल्या रामलिंग मंदिरात, कामशिनकोप येथील काठावरील मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त विशेष पुजांचे आयोजन केले जाते. तालुक्याच्या पूर्वभागातील महत्त्वाचे व मोठे मंदिर समजल्या जाणाऱ्या चिक्कहट्टीवळी येथील वीरभद्र देवस्थानातही शिवरात्री उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. नदीच्या काठावर वसलेले हे देवस्थान या भागातील श्रद्धास्थान आहे. तालुक्याच्या शेवटच्या भागात मलप्रभा नदीच्या काठावर एम. के. हुबळीनजीक महामार्गाच्या शेजारी वसलेले गंगाबिका मंदिर सर्वश्रेष्ठ मानले जाते. जगत्ज्योती बसवेश्वर यांच्या धर्मपत्नी गंगाबिकांचे समाधीस्थळ म्हणून याला विशेष महत्त्व आहे. याठिकाणीही महाशिवारात्रीनिमित्त उत्सव साजरा केला जातो. शिवाय काद्रोळी येथील अदृष्य शिवयोगी मठातही महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरवली जाते. तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भागात नवनाथपंथियांचे मठ आहेत. कुंभार्डाजवळील हंडीभडंगनाथ मठ, डोंगरगाव मठ, किरावळा मठ, बाळेवाडी मठात देखील शिवरात्र उत्सव साजरा होतो. शिवाय हलशीतील रामेश्वर मंदिर, अवरोळी ऊद्रस्वामी मठ यासह गावागावातील शिव मंदिरांत शिवरात्रीनिमित्त उपवास, आराधना, अभिषेक व महाप्रसादादी कार्यक्रम साजरे होतात. तसेच गावोगावी शिवरात्रीनिमत्त शिवउपासना केली जाते. काही ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणांचे आयोजन करण्यात येते. तसेच महाप्रसादांचे कार्यक्रम आयोजिले आहेत.

नदीपात्र कोरडे

गेल्यावर्षी पाऊस न झाल्याने मलप्रभेचे पात्र काही ठिकाणी कोरडे पडले आहे. तर खानापूर शहरालागत नदीपात्रातील पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. त्यामुळे भाविकांना यावर्षी मलप्रभेच्या स्नानाचा आनंद घेता येणार नाही. त्यांना फक्त पूजन करावे लागेल. खानापूर शहरापासून खाली 2 कि. मी. नदीपात्रात शहराचे सांडपाणी मिसळल्याने पूर्णपणे नदीपात्र दूषित झाले आहे. यासाठी भाविकांनी खानापूर शहरालगतच्या नदीपात्रात स्नान करण्याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.