Satara Police | जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सातारा शहर पोलीस ठाण्याचा कारभार महिलांच्या हाती
महिला कर्मचाऱ्यांचा सातारा पोलीस ठाण्यात सन्मान
सातारा -जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सातारा शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांची सातारा शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत महिला सक्षमपणे सातारा शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार पेलू शकतात हे दाखवून दिले. महिलांनी दिवसभर कामकाज पाहिले.
जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येलाच सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी राजेंद्र मस्के यांचा निरोप समारंभपार पडला. त्यांनी केलेले चांगल्या कामामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते
बनले होते. त्यांच्यावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्याचा वर्षाव करत त्यांना निरोप देताना अश्रू अनावर झाले. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्याचे डिटेक्शन झाले. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही घटना तणावपूर्ण झाल्या होत्या त्या हाताळल्या.
गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निरोप समारंभानंतर रविवारी जागतिक महिला दिनाचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता पोलीस ठाण्याची हजेरी महिला अंमलदार यांनी घेतले. सर्व महिला कर्मचाऱ्यांना भगवे फेटे परिधान करण्यातआले. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शहर पोलीस ठाणे, शिवतीर्थ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्ग अशी दुचाकी रॅली काढुन पुन्हा पोलीस ठाणे येथे समारोप करण्यात आला. अशा उपक्रमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
रंगपंचमीही साजरी
शहर पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्यांनी दुपारपासून एकमेकांना रंग लावून रंगपंचमीचा सण साजरा केला. आपले कर्तव्य बजावत सण, उत्सव साजरा करण्याची परंपरा सातारा शहर पोलिसांनी जोपासली असून त्यांचे कौतुक होत आहे.