पहिल्या दिवशी बहुतांश नौका बंदरातच
रत्नागिरी :
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मासेमारीचा हंगाम 1 ऑगस्टपासून सुरू झाला. पण समुद्र पूर्णत: शांत न झाल्यामुळे जिल्ह्यात पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेने मासेमारी होऊ शकली नाही. जिल्ह्यातील केवळ 20 टक्के नौका मासेमारीसाठी गेल्या होत्या. खोल समुद्रात हवामान कधीही बिघडू शकते या शक्यतेने जिल्ह्यातील अनेक मच्छीमारांनी आपली पहिल्या दिवसाची समुद्रातील फेरी पुढे ढकलली आहे. मिरकरवाड्यासारख्या मोठ्या बंदरात शुकशुकाट दिसून आला. हवामान स्थिर झाले की, मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू होईल.

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक खलाशी असलेल्या मच्छीमारांनी मासेमारीचा मुहुर्त साधला. पावसाचा जोर तुलनेत कमी असल्याने समुद्रकिनाऱ्याजवळील पाण्याचा प्रवाह कमी असल्याचे मच्छीमारांतून सांगण्यात आले. त्यामुळे काही मच्छीमारांनी किनारी भागात 10 वाव परिसरात मासेमारीचा मुहूर्त केला. तालुक्यातील वरवडे येथील काही छोटे मच्छीमार सकाळच्या सत्रात समुद्रात गेले होते. त्यांना कोळंबी, बांगडा, सौंदाळा आदी मासे मिळाल्याचे सांगण्यात येते. परंतु अजून अनेक छोटे मच्छमार खोल समुद्रात जाण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. बंपर मच्छीसाठी 15 वावाच्या पुढे जावे लागणार आहे. अचानक वातावरण बिघडले तर धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मच्छीमारांतून खबरदारी घेण्यात आली आहे.

दापोली वार्ताहर कळवितो, तालुक्यातील हर्णै, दाभोळ, बुरोंडी, आडे व केळशी येथील मच्छीमारांची पहिल्या दिवशी समुद्रात बोटी लोटण्यासाठी लगबग सुरू झाली होती. पहिल्या दिवशी दुपारी 3 वाजता दर्याराजाचे स्मरण करून सुमारे 200 नौका मासेमारीसाठी आंजर्ले खाडीतून, हर्णे येथून समुद्रवार स्वार झाल्या. यामुळे दोन महिने शांत असणारे हर्णै बंदर गजबण्यास सुऊवात झाली आहे. ‘मागील वर्षी आलेली संकटे या वर्षी न येता मागील नुकसान या वर्षी भरुन निघू दे’ अशी दर्याराजाला विनंती करून नव्या हंगामाला प्रारंभ करण्यात आला.