For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रचाराच्या आघाडीवर..

06:22 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रचाराच्या आघाडीवर
Advertisement

काँग्रेस पक्ष संपवा, असा सल्ला महात्मा गांधींनी स्वातंत्र्यानंतरच दिला आहे. आजची काँग्रेसची अवस्था पाहता महात्मा गांधींचा हा विचार लवकरच प्रत्यक्षात येईल, अशी स्थिती दिसत असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले आहे. एका प्रसिद्ध वृत्तमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. या निवडणुकीत काँग्रेसची दुर्दशा होईल, असे भाकितही त्यांनी मुलाखतीत वर्तवले. त्यांनी अनेक विषयांवर या मुलाखतील मते व्यक्ती केली आहेत.

Advertisement

आपल्या राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची सुविधा नाही. तरी काँग्रेस पक्ष सर्व मुस्लीमांना आरक्षण देण्याची तयारी करत आहे. हा देखावा असून केवळ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसने हे कारस्थान रचले आहे. घटनेत आरक्षणासंबंधी कोणती तरतूद आहे, याची काँग्रेसलाही जाणीव आहे. तथापि, लोकांना भरकटवून त्यांची मते खेचण्याची काँग्रेसची जुनी प्रवृत्ती आहे. आता हा सर्व खेळ लोकांच्या लक्षात आल्याने या निवडणुकीत ते काँग्रेसला आणखी मोठा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संपत्तीचे सर्वेक्षण घातक

Advertisement

काँग्रेसने सर्व लोकांच्या संपत्तीचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. पण हे कसे करणार, याची प्रक्रिया स्पष्ट केलेली नाही. यामुळे खेडोपाड्यांमध्ये लोकांच्या मनात चिंता दाटलेली स्पष्ट दिसून येते. वारसा कर लागू करावा, अशी सूचना काँग्रेसच्या एका विदेशस्थ नेत्याने केली आहे. ही धोरणे देशाची अर्थव्यवस्था धुळीला मिळवितील आणि तसे झाल्यास गरीबांचीच हानी मोठ्या प्रमाणात होईल. जगात कोठेही असे प्रयोग यशस्वी झालेले नाहीत. तरीही काहीही करुन मते मिळविण्यासाठी अशा अशक्यप्राय बाबी लोकांसमोर मांडल्या जात आहेत. हा आगीशी खेळ ठरु शकतो, असा अर्थाची टिप्पणीही त्यांनी मुलाखतीत केली.

400 पार चा अर्थ

भारतीय जनता पक्षाला घटना मोडीत काढण्यासाठी 400 हून अधिक जागा हव्या आहेत, असा विरोधकांचा आरोप आहे. तथापि, केवळ जागा अधिक मिळाल्या म्हणून कोणीही घटना मोडीत काढू शकत नाहीत. आपल्या घटनेतच अशी व्यवस्था आहे. न्यायालयांनीही घटनेच्या पायाभूत रचनेत कोणीही परिवर्तन करु शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. घटना मोडीत काढण्यासाठी नव्हे, तर दलित, आदीवासी यांना अधिक अधिकार मिळवून देण्यासाठी आम्हाला अधिक जागा हव्या आहेत. तथापि, विरोधकांना त्यांचा पराभव होत आहे, हे स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी आता गैरसमज पसरविण्यास प्रारंभ केला आहे. तथापि, हे डावपेच यशस्वी होणार नाहीत, असे प्रतिपादन राजनाथसिंग यांनी मुलाखतीत केले.

सर्व अधिकार मल्लिकार्जुन खर्गेंकडे

उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांमधून अनुक्रमे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उमेदवारी द्यायची की नाही, हे ठरविण्याचे सर्व अधिकार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आल्याचा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला आहे. आम्ही घाबरलेलो नाही. योग्यवेळी या संबंधी आमचे अध्यक्ष निर्णय घेतील, असे प्रतिपादन त्यांनी बुधवारी केले.

काँग्रेसने अद्यापही यासंबंधी निर्णय घेतलेला नाही. या मतदारसंघांमध्ये मतदानाच्या पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस 3 मे हा आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना लवकरात लवकर उमेदवारांच्या नावांची घोषणा करावी लागणार आहे. भारतीय जनता पक्षाने अमेठी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली असून त्यांनी प्रचारालाही प्रारंभ केला आहे. रायबरेलीत मात्र अद्याप भारतीय जनता पक्षानेही उमेदवारची घोषणा केलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात यासंबंधी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या 24 तासांमध्ये नावांची घोषणा अपेक्षित आहे. हे दोन्ही मतदारसंघ गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ मानले जातात. प्रथम लोकसभा निवडणुकीपासून, काही अपवाद वगळता या मतदारसंघांमधून या घराण्यातील व्यक्ती निवडून आल्या आहेत. 1977 मध्ये या दोन्ही मतदारसंघांमधून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. यावेळी अद्याप कोणालाही काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने तो चर्चेचा विषय झालेला आहे. काँग्रेसनेही सस्पेन्स कायम ठेवला आहे.

Advertisement
Tags :

.