लष्कर-ए-तोयबाशी संपर्काच्या संशयावरून
कलबुर्गीत एकाला अटक
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर
दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या संशयावरून केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पश्चिम बंगालमधील ममताजुल मलिक याला कलबुर्गी येथे अटक केली आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी समाजमाध्यमांद्वारे संपर्क असल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याची कसून चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ममताजुल मलिक हा कलबुर्गीतील सराफ बाजार परिसरात आपल्या भावासोबत सोन्या-चांदीचे दागिने बनविण्याचे काम करीत होता. समाजमाध्यमांद्वारे त्याचा पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा संघटनेशी संपर्क असल्याचे तपासात समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. संदेशांच्या माध्यमातून त्याने काही महत्त्वाची माहिती सामायिक केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुप्तचर विभाग आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. कलबुर्गीतील ब्रह्मपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. संबंधित संदेशांचे स्वरूप, संशयिताचे संपर्क आणि कथित माहितीची देवाणघेवाण याबाबत तपास यंत्रणा अधिक चौकशी करीत आहेत. दरम्यान, अलीकडेच कत्तलखान्यात काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका तऊणाला अटक करण्यात आली होती.
