श्री बोडगेश्वराच्या दर्शनासाठी शनिवारी भाविकांची एकच गर्दी
प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा येथील श्री बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला असून शनिवारी श्री देव बोडगेश्वराच्या दर्शन घेण्यासाठी व फेरीचा आनंद लुटण्यासाठी भाविकांनी एकच मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे यंदा श्रीच्या दर्शनासाठी रांगा पणजी रस्ता व कळंगुट बाजूनी बोशन होमपर्यंत लागलेल्या पहायला मिळाल्या. हा जत्रोत्सव गुऊवार दि. 8 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यंदा जायंट व्हील बंद असले तरी फेरीतील अन्य स्टॉल्स लोकांचे लक्ष वेधत आहेत.
जत्रोत्सवाच्या पूजेचे यजमानपद देवस्थान समितीचे अध्यक्ष अॅड. वामन पंडित यांनी सपत्नीक भूषविले. दुपारी 12 वाजता देवाच्या चरणी श्रीफळ ठेवून व पुरोहितांनी गाऱ्हाणे घातल्यानंतर यंदा जत्रोत्सवाला प्रारंभ झाला. आरोग्यमंत्री विश्वजित राणे, उपसभापती ज्योशुआ डिसोझा, जिल्हाधिकारी अंकीत यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर, उपजिल्हाधिकारी वर्षा परब, पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा, निरीक्षक नवीन देसाई, संजीत कांदोळकर, मार्लन डिसोझा, मामलेदार अनंत मळीक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार जीत आरोलकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार संकल्प आमोणकर, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, प्रकाश भिवशेट आदींनी श्रीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. बोडगेश्वर जत्रोत्सवाला भरगच्च फेरी भरलेली आहे. अबालवृद्ध जत्रोत्सवाच्या फेरीला व देवदर्शनासाठी म्हापशात दाखल झाले आहेत. आकर्षक असे विविध साहित्य जत्रोत्सवात उपलब्ध झाले आहे. मात्र यंदा जायंट व्हील नसल्याने बालगोपाळांचा विरस झालेला आहे.
पिकअप ड्रायव्हर असोसिएशन म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा
म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वराच्या महान जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवार दि. 4 रोजी सकाळी 10 वा. पिकअप -ड्रायव्हर असोसिएशन म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी 5.30 वा. संगीत संध्या हा सुगम संगीताचा कार्यक्रम, सायंकाळी 7.30 वा. स्वर धारा हा भावगीत, युगुल गीतांचा, नाट्यागीत कार्यक्रम होईल. सोमवार दि. 5 रोजी सकाळी 10 वा. म्हापशातील मासळी विक्रेत्या महिलांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी 5 वा. वेषभूषा स्पर्धा होईल.(वयोगट 5 ते 9 व 10 ते 14) स्पर्धेचे पहिले बक्षीस ऊ.3000/- दुसरे बक्षीस ऊ. 2500/-, तिसरे बक्षीस ऊ.2000/-, 2 उत्तेजनार्थ बक्षिसे ऊ.1000/(स्पर्धकांनी संध्याकाळी 4.00 वा. हजर राहावे). सायंकाळी 7 वा. निधी स्कूल ऑफ डान्स यांचे भरतनाट्याम नृत्य होणार आहे. रात्री 8.30 वा. ‘स्वर अनंत’ भावगीत, युगुलगीत, नाट्यागीतांचा कार्यक्रम होईल.