For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकीकडे शिवशंकराचा जयघोष, दुसरीकडे स्त्रीशक्तीचा गौरव

10:17 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
एकीकडे शिवशंकराचा जयघोष  दुसरीकडे स्त्रीशक्तीचा गौरव
Advertisement

विविध ठिकाणी महिला दिन साजरा

Advertisement

बेळगाव : शहर परिसरात एकीकडे शिवशंकराचा जयघोष तर दुसरीकडे शिवशक्ती स्वरुप मानल्या जाणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव असे चित्र पहावयाला मिळाले. महाशिवरात्री आणि महिला दिन एकाच दिवशी आल्याने समाज माध्यमांवर शिवशक्ती या अर्थाने अनेक संदेशांची देवाण-घेवाण झाली आणि परस्परांशिवाय दोघांचेही रुप पूर्ण नाही हे पुन्हा अधोरेखित झाले.

आयसीएआय भवन येथे  महिला दिन साजरा

Advertisement

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटटच्या बेळगाव शाखेतर्फे शुक्रवारपेठ येथील आयसीएआय भवन येथे महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून आहारतज्ञ चेतना नागेश, सीए हिमांगी प्रभू उपस्थित होत्या. बेळगाव शाखेचे चेअरमन सीए राजेंद्र मुंदडा यांनी सर्वांचे स्वागत केले. सीए संजीव देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी चेतना नागेश यांनी आपल्या आहाराच्या सवयी आणि बैठ्या जीवन शैलीमुळे या सवयींमध्ये करण्याचे बदल याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी इव्हेंट चेअरमन संगीता माहेश्वरी उपस्थित होत्या.

कसबेकर मेटगुड क्लिनिक

कसबेकर मेटगुड क्लिनिकमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून केंद्रीय कर आणि केंद्रीय जीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त जयभारती उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी संचालक व सीईओ डॉ. बसवराज मेटगुड होते. जय भारती म्हणाल्या, घटनात्मक अधिकार आणि अंमलबजावणी यातील दरी दूर करण्याची गरज आहे. आजच्या जगात महिलांचे मत आणि योगदान दुर्लक्षित केले जावू शकत नाही, यावरही त्यांनी भर दिला. डॉ. केतकी भोसले यांनी गर्भाशयाचा मुखाच्या कर्करोगाबद्दल माहिती दिली व यासाठी केंद्र सरकारच्या ग्रीवा लसीकरण कार्यक्रमांतर्गत 9 ते 14 वयोगटातील मुलांना देण्यासाठी लस उपलब्ध आहेत, असे सांगितले. यावेळी जयभारती व सेंट्रल जीएसटीच्या साहाय्यक आयुक्त तशरीन ताजसय्यद व क्लिनिकमधील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. एस. एच. मेटगुड, स्वरुपा मेटगुड, शीला चक्की, डॉ. पी. एन. शांतगिरी उपस्थित होते.

प्राईड सहेलीतर्फे पाच महिलांचा सत्कार

जायंट्स प्राईड सहेलीने बी. के. मॉडेल येथे महिला दिन साजरा केला. यावेळी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या पाच महिलांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजश्री अनगोळ, ओशो मेडिटेशनच्या साधना सफारे, शिक्षिका शैला चाटे, अॅथॅलीट रुपाली निरंजन व फास्टफूड चालक विद्या पै यांचा सत्कार करण्यात आला. मोलानी शहा यांनी दीपप्रज्वलन केले. बी. के. मॉडेल इंग्रजी शाळेच्या विद्यार्थिनींनी ‘बाई पण भारी देवा’ या गीतावर नृत्य केले. सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुचेता कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी माजी अध्यक्षा आरती शहा, सचिव जिग्ना शहा, निरुपमा, ज्योती, स्नेहा शहा, अस्मिता जोशी उपस्थित होत्या.

कॅम्प येथे महिला दिन साजरा

कॅम्प येथील अक्षय टीव्हीएस महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. शैला उडचणकर, स्वाती जोग तसेच अक्षय टीव्हीएसच्या कार्यकारी संचालक आर्या हेर्लेकर, शंतनु हेर्लेकर उपस्थित होते. डॉ. शैला या होमिओपॅथिक डॉक्टर असून, त्यांनी उपस्थितांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

Advertisement
Tags :

.