For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकीकडे टार्गेट तर दुसरीकडे जागृती!

12:06 PM Dec 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
एकीकडे टार्गेट तर दुसरीकडे जागृती
Advertisement

‘अबकारी’तील गोंधळावर सर्वपक्षीय आमदारांकडून बोट

Advertisement

बेळगाव : कर्नाटकातील बेकायदा दारूविक्रीवर मंगळवारी विधानसभेत जोरदार चर्चा झाली. दारूविक्रीसाठी अधिकाऱ्यांना टार्गेट दिले जात आहे. तर दुसरीकडे दारूचे दुष्परिणाम सांगण्यासाठी अबकारी अधिकाऱ्यांकडून जागृती करण्यात येत आहे. हा विरोधाभास नाही का? असा प्रश्न सर्वपक्षीय आमदारांनी विचारला. प्रश्नोत्तराच्या तासात हरिहरचे आमदार बी. पी. हरिश यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी हरिहर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात बेकायदा दारूविक्री प्रकरणे दिसून आली आहेत. मात्र, दारू तयार करण्याचे प्रकार आढळून आले नाहीत. बेकायदा दारू विकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, असे सांगितले.

यावर बी. पी. हरिश यांनी आपल्या एका मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील ही परिस्थिती नाही. संपूर्ण राज्यात बेकायदा दारूविक्री वाढली आहे. लहान मुले, शाळकरी मुले व्यसनाधीन बनत आहेत. सरकार एकीकडे दारूविक्री वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांना टार्गेट देत आहे तर दुसरीकडे जागृती केली जात आहे. स्वत: अबकारी मंत्र्यांनी असे उत्तर दिले आहे, हा विरोधाभास नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसचे आमदार बी. आर. पाटील यांनी यासंबंधी एक सदन समिती नियुक्त करण्याची मागणी केली. एकीकडे विक्री वाढवताना दुसरीकडे जागृती कसली करता? अबकारी विभागात नेमके काय चालले आहे? याविषयी सदन समितीकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. आमदारांनी बोलावलेल्या बैठकीला अबकारी अधिकारी येत नाहीत. जागृती तर दूरच राहिली, असे हरिश यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.