For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे पदयात्रांचा सुकाळ!

06:30 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे पदयात्रांचा सुकाळ
Advertisement

पीकहानीमुळे एकरी 25 हजार रुपये भरपाई द्यावी, 8 तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, पिण्याचे पाणी व जनावरांना चाऱ्याची सोय करावी, या निजदच्या प्रमुख मागण्या आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेणे या यात्रेचा उद्देश असल्याचे निजद नेत्यांनी सांगितले आहे. भाजप-निजद यात्रेला टक्कर देण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षानेही भारत जोडो-2 ला कर्नाटकात सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपूर मतदारसंघातून यात्रेला सुरुवात झाली आहे.

Advertisement

माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नाईस योजनेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. 3 लाख कोटी रुपयांच्या या व्यवहारात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व अशोक खेणी यांनी योजनेआड मोठ्या प्रमाणात जमिनी बळकावल्या आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. आपली मालमत्ता किती आहे? हे विचारण्याचा अधिकार कुमारस्वामी यांना कोणी दिला? कायदेशीर मार्गानेच आपण मालमत्ता कमावली आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कुमारस्वामी यांचा आरोप फेटाळला आहे. डी. के. शिवकुमार यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावे 300 एकर जमीन बळकावली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपली नैतिकता गहाण ठेवली आहे. त्यामुळेच नाईस विरुद्ध कारवाई करणे त्यांना शक्य नाही. मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. कंत्राटदार अशोक खेणी यांना अटक करण्याची मागणीही कुमारस्वामी यांनी केली आहे.

परदेशात जाण्यापूर्वी व परदेशातून परतल्यानंतर दसरोत्सवा दरम्यान आपण एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार, असे कुमारस्वामी यांनी जाहीर केले होते. संपूर्ण देशात खळबळ माजवणारी बातमी आपण देणार आहोत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. त्यानंतर आता नाईस कॉरिडॉरमधील घोटाळ्याचा त्यांनी पर्दाफाश केला आहे. नाईसविरुद्ध यापूर्वी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनीही वेळोवेळी आवाज उठविला होता. 2-जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्यापेक्षा हा घोटाळा मोठा आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची मालमत्ता 1 हजार 413 कोटी रुपयांना कशी पोहोचली? असा प्रश्नही कुमारस्वामी यांनी उपस्थित केला आहे. या विषयावर विधानसौधच्या पायऱ्यांवर चर्चा करण्यासाठी आपण तयार आहोत, असे आव्हान देतानाच हा केवळ नाईस घोटाळ्याचा पहिला भाग आहे. लवकरच त्याचा दुसरा भागही आपण उघड करणार आहोत, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले आहे. यावरून कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप व त्यांचा मित्रपक्ष निजद हे तिन्ही पक्ष आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. युद्ध सुरू करण्यापूर्वी त्याचा सराव सुरू झाला आहे, असाच याचा अर्थ काढला जात आहे.

Advertisement

विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप-निजद नेत्यांची बैठक झाली. 2028 च्या निवडणुकीत 180 जागा जिंकण्यासाठी भाजप-निजद म्हणून नव्हे तर एनडीए म्हणून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरविण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, एच. डी. कुमारस्वामी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आदींसह निजदच्या नेत्यांनीही या बैठकीत भाग घेतला होता. विधान परिषद, विधानसभेच्या निवडणुका असोत किंवा इतर कोणत्याही निवडणुका असोत, एकत्रितपणे सामोरे गेलो तरच गोल गाठता येणार आहे, असे सांगत विधान परिषदेच्या चार जागांसाठी शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरविण्यात आले आहे. एकीकडे पावसाअभावी निर्माण झालेला दुष्काळ, पाणीटंचाई, विजेचा लपंडाव, महागाई आदींमुळे सर्वसामान्य जनता हैराण झालेली असतानाच आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी मात्र एक-दीड वर्षे आधीच सुरू झाली आहे.

1 ऑक्टोबरपासून बंगारपेठपासून मुद्देबिहाळपर्यंत भाजपची विजय संकल्प यात्रा निघणार आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत ही यात्रा चालणार आहे. त्यांचा मित्रपक्ष असलेल्या निजदनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी स्वाभिमान यात्रा सुरू केली आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या कनकपूरपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. एच. डी. कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखिल कुमारस्वामी हे या यात्रेचे नेतृत्व करीत आहेत. पीकहानीमुळे एकरी 25 हजार रुपये भरपाई द्यावी, 8 तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, पिण्याचे पाणी व जनावरांना चाऱ्याची सोय करावी, या निजदच्या प्रमुख मागण्या आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेणे या यात्रेचा उद्देश असल्याचे निजद नेत्यांनी सांगितले आहे. भाजप-निजद यात्रेला टक्कर देण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षानेही भारत जोडो-2 ला कर्नाटकात सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपूर मतदारसंघातून यात्रेला सुरुवात झाली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या 84 मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्या सर्व मतदारसंघांना भेटी देऊन आगामी निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारत जोडो-2 ला सुरुवात झाली आहे. बुधवार दि. 30 सप्टेंबरपासून 84 दिवस ही यात्रा सर्व जिल्ह्यात पोहोचणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. कर्नाटकात या यात्रेने 600 किलोमीटरचा टप्पा पार केला होता. याची आठवणही ताजी करतानाच ज्या ज्या मतदारसंघात भाजप-निजदचे उमेदवार विजयी झाले आहेत, तेथे काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी सांगितले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघापासूनच भारत जोडोला चालना देण्यात आली आहे. यावरून तिन्ही प्रमुख राजकीय पक्ष यात्रेत गुंतले आहेत, हे लक्षात येते. एच. डी. कुमारस्वामी यांनी तर नाईस घोटाळ्याचा दुसरा भाग उघड करून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अडचणी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दक्षिणेतील वोक्कलिगांचा नेता कोण? यासाठीच हा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.

रमेश हिरेमठ

Advertisement
Tags :

.