For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकीकडे खडीची मलमपट्टी, दुसरीकडे कानाडोळा

12:57 PM Jul 28, 2025 IST | Radhika Patil
एकीकडे खडीची मलमपट्टी  दुसरीकडे कानाडोळा
Advertisement

चिपळूण :

Advertisement

गुहागर मार्गावर मिरजोळी येथे चार दिवसांपूर्वी दुचाकीवरून पडून महिलेचा अपघात झाला असून ती गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे ठेकेदारासह राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. तिही अर्धवट असून एका भागातील खड्यांवर खडीची मलमपट्टी करण्यात आली असून दुसऱ्या ठिकाणच्या खड्यांकडे कानाडोळा करण्यात आला आहे. यामुळे मिरजोळी, कोंढे, शिरळमधील ग्रामस्थ आठवडाभरात राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहेत.

गेल्या काही वर्षापासून मिरजोळी-साखरवाडी व बौध्द स्मशानभूमीसमोर समाज दरवर्षी मोठयाप्रमाणात खड्डे पडत आहेत. असे असताना रस्त्याचे रूंदीकरण होणार असल्याचे कारण देत साखरवाडी येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर स्मशानभूमीसमोर पडणाऱ्या खड्यांच्या परिसरात तब्बल २५ लाख रूपये खर्च करून रस्ता चकाचक करण्यात येणार आहे. मे महिन्यात त्यातील पहिल्या थर टाकून ठेकेदार गायब झाल्याने पुढील काम रखडले आहे. मात्र तरीही प्रत्यक्षात २ लाखाचेही काम झाले नसताना या ठेकेदाराला सुमारे १० लाख रूपयांचे बिल अदा करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हा ठेकेदार मुंबईतील असल्याने तो अधिकाऱ्यांचे ऐकत नसल्याचेही वृत्त आहे.

Advertisement

त्यामुळे ज्या साखरवाडी भागात थोडीफार तर स्मशानभूमीजवळ १० लाख रूपये खर्च करून रस्त्यांची कामे करण्यात आली त्या दोन्ही भागात सध्या रस्ताच खड्यात गेला आहे. तरीही येथे उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा परिणाम म्हणून चार दिवसांपूर्वी एक महिला पतीच्या दुचाकीवरून पडून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत. ही माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकाऱ्यांना देण्यात आल्याने आता स्मशानभूमीसमोर खडी टाकून मलमपट्टी करण्यात आली आहे. मात्र साखरवाडी येथे कानाडोळा करण्यात आला आहे. त्यामुळे येथेही अपघात होण्याची वाट बघितली जातेय का असा संतप्त सवाल उपस्थित होत असून याविरोधात मिरजोळी, कोंढे व शिरळ येथील ग्रामस्थ लवकरच राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहेत.

  • म्हणून होत नाही अपघातांची नोंद 

दोन्ही ठिकाणी दरवर्षी अपघात होऊन महिला जखमी होत आहेत. मात्र अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद केल्यास हलगर्जीपणाचा ठपका ठेऊन दुचाकी चालवणाऱ्यावरच गुन्हा दाखल होण्याची भीती असल्याने या अपघातांची नोंद होत नाही.

Advertisement
Tags :

.