kolhapur : 'वृत्तपत्रविक्रेता'दिनी 'तरुण भारत संवाद'सोबत विद्यार्थ्यांनी गिरवला स्वावलंबनाचा धडा!
'तरुण भारत संवाद'तर्फे विविध शाळांमध्ये ' चला गिरवूया स्वावलंबनाचा धडा ' उपक्रम
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 'वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने साजरा केला जातो . या दोन्ही निमित्तांचा सुंदर संगम साधत दै. 'तरुण भारत संवाद'तर्फे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ' चला गिरवूया स्वावलंबनाचा धडा ' उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात आला.
यावेळी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी डी. सी कुंभार म्हणाले,हा उपक्रम विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच स्वावलंबनाकडे नेणारा ठरला आहे. तरूण भारत संवादने नेहमी नवनवीन उपक्रम राबवून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. तरुण भारत संवादच्या उपक्रमामुळे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याला उजाळा मिळाला असुन वृत्तपत्र विक्रेत्यांचे महत्त्व विशद झाले आहे.
त्याचबरोबर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित तरुण भारतचे निवासी संपादक सुधाकर काशीद म्हणाले, महापालिकेच्या शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढत वाढली आहे. गुणवत्तेच्या जोरावर महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर चमक दाखवली आहे. खासगी शाळांना टक्कर देत आजही महापालिकेच्या शाळा गुणवत्तेच्या जोरावर टिकून आहेत.
पीएमश्री महात्मा फुले विद्यालयातील सहावीच्या रूद्र वाईगडे, अध्युज्ञ पाटील व सातवीच्या आयुष पाटील या विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठुन दैनिक तरूण भारत संवादचा अंक सायकलवरून घरोघरी वाटप केला. यांनतर शाळेत येऊन कमवा व शिकाचा प्रत्यक्ष कृतीतून अनुभव घेतला. सहावीतील श्रेया आंबेकर, रौनक वाईगडे या विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दूल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमामध्ये तरूण भारत संवादचे निवासी संपादक सुधाकर काशीद, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, केंद्रमुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अमर पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया खाडे, उपस्थिती होते.