सोमवारी बाजार अल्पशा तेजीसोबत बंद
सेन्सेक्स, निफ्टी उच्चांकावर : मिडकॅप निर्देशांक चमकला
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी भारतीय शेअर बाजाराने सर्वकालीक उच्चांकी झेप घेतली होती पण दिवसअखेर मात्र अल्पशा तेजीसोबत बाजार बंद झालेला पाहायला मिळाला. सुरुवातीला असणारी तेजी अखेरीस विक्रीचा दबाव वाढल्याने बाजाराने गमावली.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 23 अंकांनी वाढत 81355 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 1 अंकांच्या वाढीसोबत 24836 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी बँक निर्देशांक 110 अंकांच्या वाढीसह 51406 अंकांवर, स्मॉलकॅप निर्देशांक 59 अंकांच्या वाढीसह 8873 अंकांवर आणि मिडकॅप निर्देशांक 593 अंकांनी वाढत 58362 अंकांवर बंद झालेला होता. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांकाने 81908 अंक आणि निफ्टीने 24,999 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती.
सेन्सेक्समधील 30 पैकी 17 समभाग तेजीसोबत तर 13 समभाग अर्थातच नुकसानीसोबत बंद झाले होते. निफ्टी 50 मधील 25 समभाग तेजीत आणि 25 घसरणीत राहिले होते. विदेशी गुंतवणूकदारांनी 2546 कोटींच्या समभागांची आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2774 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. लार्सन टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रिज, महिंद्रा आणि महिंद्रा व एसबीआय यांचे समभाग तेजीत राहिले तर एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयटीसी आणि कोटक बँक यांचे समभाग घसरणीत राहिले होते.
जागतिक बाजारात तेजी
आशियाई बाजारात सोमवारी तेजी पहायला मिळाली. जपानचा निक्केई 2.13 टक्के आणि हाँगकाँगचा हँगसेंगमध्ये 1.28 टक्के इतकी तेजी होती. चीनचा शांघाई कम्पोझीटही 0.033 टक्के तेजीत कार्यरत होता. 26 जुलैला डाओ जोन्स 1.64 टक्के वाढीसह 40,589 अंकांवर बंद झाला होता तर नॅसडॅक 1.03 टक्के वाढीसह 17,357 अंकांवर बंद झाला होता. सार्वजनिक बँकांचा निर्देशांक 2.20 टक्के वाढला.