For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंधाऱ्या वाटेने...शहेनशाह ठाकरे बंधू एकत्र!

06:25 AM Dec 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
अंधाऱ्या वाटेने   शहेनशाह ठाकरे बंधू एकत्र
Advertisement

ठाकरे बंधूंच्या युतीची शहेनशहा चित्रपटाशी तुलना जरा जास्तच फिल्मी वाटेल पण ठाकरे बंधू एका अंधाऱ्या राजकीय वाटेवरून शहेनशहाच्या थाटात हातात दांडके घेऊन चालले आहेत... 1988 साली अमिताभ असाच डबल रोल करत चालला होता. संवाद, स्टाइल, हातात दंडुका, आणि थीम सॉंग यामुळे चित्रपट कल्ट क्लासिक मानला जातो. त्यातून अमिताभ बच्चन यांच्या करिअरला पुन्हा उभारी मिळाली. राजकीय भ्रष्टाचार, पोलिस-नेते-गुंड साखळी आणि सामान्य माणसाची असहाय्यता हे तेच सामान्य माणसाच्या मनात घर करून असणारे मुद्दे तेव्हा कामी आले. ठाकरे बंधूही सध्या याच वाटेवर आहेत.

Advertisement

इन्स्पेक्टर विजय कुमार श्रीवास्तवची सौम्य भूमिका आणि हतबल कायदा यावर त्या काळात शहेनशहा हा उतारा होता. लोकांच्या मनातला राग अमिताभ बच्चन चित्रपटांनी बाहेर काढला असे म्हणतात. ठाकरे बंधू लोकांचा असा राग जागा करायला चालले आहेत. अपेक्षेप्रमाणे मराठी माणसांनी त्यांच्या एकत्रीकरणाचे स्वागत केले हे खरे आहे पण एक भैय्या आधी गोठा आणि नंतर तेच अवैध व्यवसायाचे ठिकाण करून जमीन बळकावून बसलेला चित्रपटात दाखवला आहे ज्याला शहेनशहा सरळ करतो तसे काही हे बंधू वास्तवात घडवू शकतील का? तेवढी मते, तेवढी शक्ती मराठी माणूस त्यांच्या पदरात टाकेल का? हा सध्या चर्चेचा विषय आहे कारण त्यांची पूर्वी लढाई काँग्रेसशी होती. बरेच बाबतीत शिवसेनेच्या प्रचारामुळे त्यांचा पक्ष बॅकफुटवर जायचा. त्यातल्या मराठी नेत्यांची शिवसेनेला सहानुभूती असायची. आज लढाई भाजप बरोबर आहे आणि त्यांनी समोर मराठी माणसांची फळी उभी केली आहे. आधी ती शक्ती आणि नंतर भाजपकडे असणारी परप्रांतीय अर्थ आणि मतशक्ती यांच्याशी त्यांचा सामना आहे. ज्याकडे भावनेने नव्हे तर डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. तब्बल 20 वर्षांनंतर झालेली ठाकरे बंधूंची युती ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी घटना आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितले की, ‘मराठी माणसाची एकता टिकवण्यासाठी ही युती आवश्यक आहे. मुंबईला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत.’ राज ठाकरेंनीही याला दुजोरा देत म्हटले की, ‘20 वर्षांनंतर आम्ही एकत्र आलो आहोत, कारण मराठी मतांचे विभाजन होऊ नये.’ ही युती प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेसाठी असली तरी तिचा विस्तार इतर महापालिकांपर्यंत होण्याची शक्यता आहे. या युतीची पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवले. मात्र, 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धवांचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुतीने सत्ता मिळवली. दुसरीकडे, राज ठाकरेंच्या मनसेला विधानसभा निवडणुकांत फारसे यश मिळाले नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकांत राज यांनी महायुतीला पाठिंबा दिला, पण परिणाम सकारात्मक नव्हता.

फक्त मराठी मतांवरच मदार असेल?

Advertisement

आता, ठाकरे बंधूंची युती ही मराठी मतदारांना एकत्र करण्याची रणनीती आहे. मराठी मतदार हे शिवसेना आणि मनसेचा मुख्य आधार आहेत. पण, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच केवळ मराठी मतांवर विसंबून न राहता इतर जातीय आणि प्रांतीय घटकांमध्ये सुद्धा आपला मतदार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आजच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांचे आव्हान कायम आहे. 2002 मध्ये जे ‘मी मुंबईकर’ अभियान आणि पुढे ‘करून दाखवले’ हे

कॅम्पेन त्यांनी निवडणुकांमध्ये यशस्वी केले, तेच पुत्र आदित्यच्या रूपाने उद्धव ठाकरे मुंबईतल्याकॉलनी आणि अपार्टमेंटमध्ये अगदी तळागाळात घुसून आजही राबवत आहेत. आपल्या हातात महापालिका असताना केलेल्या कामाची बारीक-सारीक माहिती ते लोकांना सांगून प्रभावित करत आहेत. तर दुसरीकडे धारावीसारख्या झोपडपट्टीच्या परिसरातील सर्वप्रांतीय नागरिक, व्यापारी, उद्योजक जेव्हा विस्थापित होणार आहेत त्यावेळेला त्यांची एकजूट करण्यासाठी सुद्धा छोट्या छोट्या सभा आदित्य ठाकरे गेले दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून घेत, एक वेगळा मतदार आपल्या सोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई आणि मराठी माणसांच्या प्रश्नापुरती शिवसेना आणि मनसे उरलेली आहे असे जेव्हा माध्यमे आणि विचारवंत सुद्धा म्हणतात, तेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्या या कृतीकडे दुर्लक्ष करत असतात. काहींचे हे दुर्लक्ष हेतूत: असते यात शंकाच नाही. पण, त्याचवेळी मुंबई उकरली वगैरे भाजप शिंदे सेना विरोधी प्रचार काही माध्यमे करतात. मेट्रोची गती एका मोठ्या वर्गावर प्रभाव पाडत असते. त्याचा भाजपलाही लाभ होतो. त्याकडेही हेतुत:च दुर्लक्ष होते. प्रशासकाच्या काळात सरकार पुरस्कृत मुंबई महापालिकेची झालेली रिकामी तिजोरी आणि ठाकरेंनी त्यांच्या सत्तेच्या काळात विकासकामे करूनही केलेली बचत हे मुद्देही लोकांच्या समोर येणार आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकांत शिवसेनेने 84 जागा जिंकल्या, तर मनसेला 7 जागा मिळाल्या. केवळ मराठीचा मुद्दा अशा वेळी 2026 च्या निवडणुकीत उपयोगात येईल आणि तेवढ्यावरच ठाकरे बंधू लढतील असे म्हणणे चुकीचे आहे. हे नक्की की जर ही युती झाली नसती तर मराठी मते विभागली जाऊन भाजप-शिंदे सेनेला फायदा झाला असता. जी शक्यता आता खूप कमी झाली आहे.

भाजप नेते मुंबईत अडकणार

महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा विचार केला तर ही युती मोठा बदल घडवू शकते. त्यामुळेच नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीचा विचार करून एकनाथ शिंदे, गणेश नाईक यांनी एकमेकांशी जुळवून घेतले. हे अचानक घडत नाही. त्यामागे जो धाक आणि कारणे आहेत ती ठाकरेंच्या एकत्रीकरणात! ठाकरे बंधूंमुळे फडणवीसांपासून सगळे महत्त्वाचे नेते आता मुंबईत अडकून पडणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रात त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला बराच अंशी उसंत मिळणार आहे. या महापालिकांमध्ये ते पक्ष आता आपली ताकद दाखवायला मोकळे झाले आहेत. महाराष्ट्रात मुंबई व्यतिरिक्त पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, अकोला, लातूर, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, जळगाव, भिवंडी-निजामपूर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जालना, पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर, कोल्हापूर अशा महापालिकांमध्ये एकूण सुमारे 5,000 हून अधिक नगरसेवक आहेत. इथे भाजप प्रमाणेच विरोधकांचा आकडाही वाढणार. पालिकांमध्ये महायुतीने 207 नगराध्यक्षपदे आणि 4,422 जागा जिंकल्या. त्यांना महापालिकेत आव्हान निर्माण होईल. ठाकरेंशी जोडून राहायचे की नाही हे काँग्रेसला आणि पवारांनाही पुढे ठरवावे लागणार आहे. दोन्ही ठाकरेंनी आपल्यापुरता प्रश्न सोडवला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई वगळता अन्य काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढेल. पश्चिम महाराष्ट्रात तर अजित पवार सुद्धा त्यांच्यासोबत असतील अशी सध्याची स्थिती आहे. भाजपने अजित पवारांना मोकळे सोडून काय साधले? हे निकालानंतरच कळेल. पण आता तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही त्यामुळे तरतरी आली आहे. जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी मिळवलेले ईश्वरपूर आणि आष्ट्याचे यश त्यांच्या मनसुब्यांना उब देणारे ठरले. काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष आपल्या मुंबईत बेघर असलेल्या प्रदेशाध्यक्षांना टिळक भवनाच्या इमारतीतील मुक्कामात नवी स्वप्ने दाखवू लागले आहेत. मुंबईत काँग्रेसच्या जागा वाटपाचा दबाव नसल्यामुळे ठाकरे बंधू खुश आहेत. शिवसेना 70 टक्के जागा लढवेल, तर मनसे 30 टक्के. या जगात दोघांनाही पुरेशा ठरतील आणि परस्परांचे उमेदवार कोण असतील यावरही त्यांचे एकमत झाल्याचे दिसते. ही युती मराठी बहुल भागात मजबूतच आहे. जसे की दादर, शिवडी, वरळी, गोरेगाव इ. मात्र, गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांमध्ये तिचा प्रभाव निर्माण होतो का? हा खरा प्रश्न आहे. भाजपने 2017 मध्ये 82 जागा जिंकल्या होत्या. त्यांना त्या जागा वाढवायच्या आहेत. तर शिंदे सेनेला यंदा फायदा होऊ शकतो. इतर महापालिकांमध्येही या युतीचा प्रभाव दिसेल. उदाहरणार्थ, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत एमएनएसची मजबूत पकड आहे, तर पुणे आणि नाशिकमध्ये शिवसेनेची. या युतीमुळे मराठीवाद पुन्हा उफाळून येऊ शकतो. महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय समीकरणे या युतीच्या यशापयशावर अवलंबून आहेत.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.