ओम्कार साळवी आरसीबीचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक
वृत्तसंस्था/ मुंबई
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने मुंबईचे विद्यमान प्रमुख प्रशिक्षक ओम्कार साळवी यांची यावर्षीच्या आयपीएल मोसमासाठी वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली 23-24 मध्ये मुंबईन रणजी करंडक पटकावला व त्यानंतर ऑक्टोबरमध्ये इराणी चषकातही जेतेपद पटकावले.
आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम पाहण्याची ही साळवी यांची दुसरी वेळ असेल. याआधी त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स संघात साहायक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पाहिले होते. ते याआधीही मुंबई संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकही होते. गमतीची गोष्ट म्हणजे त्यांचा भाऊ अविष्कार साळवी हे भारतीय महिला संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक व पंजाब संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहे. गेल्या मोसमात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सईद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी पंजाबने जिंकली होती.
येत्या मार्चमध्ये स्थानिक मोसम संपल्यानंतर ओम्कार साळवी कोहलीच्या आरसीबीमध्ये सामील होतील. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल 2025 मोसमाची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. साळवींचा मुंबई संघाशी मार्चअखेरपर्यंतच आहे.