For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओंकार प्रधान, रुप गणेशाचे

06:27 AM Sep 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओंकार प्रधान  रुप गणेशाचे
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

परब्रह्म हे निर्गुण, निराकार असून सर्वव्यापी आहे. त्याला एकदा ‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे मी ब्रह्म आहे असे स्फूरण झाले. त्यातून परब्रह्माने ओंकार प्रधान असलेले श्रीगणेशाचे सगुण रूप धारण केले. हा उल्लेख श्री व्यास मुनींनी रचलेल्या वेदात आलेला आहे. ओंकार हा शब्द आकार, उकार आणि मकार या तीन मात्रातून तयार झाला आहे आणि त्या तीन मात्रातून श्री ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांची निर्मिती झाली. म्हणजेच ओंकार प्रधान रूप असलेल्या श्रीगणेशाने या तीन देवांची रूपे घेतली. ह्या घटनेचा उल्लेख श्री तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून करतात. तो अभंग असा,

ओंकार प्रधान, रूप गणेशाचे रूप गणेशाचे ।। धृ ।। हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।। 1 ।। अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला।। 2।। एसे तिन्ही देव जेथून उत्पन्न, तो हा गजानन मायबाप ।। 3 ।। तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पाहवी पुराणी व्यासाचिया ।। 4 ।।

Advertisement

श्री तुकाराम महाराजांचा हा अभंग प्रसिद्ध आहे. सुमन कल्याणपूर यांनी त्यांच्या सुश्राव्य आवाजात गायलेला हा अभंग गणेशोत्सवाच्या काळात दिवसातून किमान एकदा तरी कुठे ना कुठे ऐकायला मिळतोच.

अभंगात श्री तुकाराम महाराज श्रीगणेशाच्या रुपाबद्दल सांगताना म्हणतात, मी व्यासांच्या वेदवाणीचा हवाला देऊन सांगतो की, श्रीगणेशाचे रूप ओंकार प्रधान असून, ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन देवांचे श्रीगणेश हे जन्मस्थान आहेत. ओंकाराच्या तीन मात्रापैकी अकारातून ब्रह्मा, उकरातून विष्णू आणि मकरातून महेश प्रकट झाले. ब्रह्मदेवाकडे सृष्टी निर्माण करण्याचे कार्य दिलेले असून विष्णू तिचे पालनपोषण करतात. सृष्टीच्या संहाराचे कार्य महेश करतात.

गणेशगितेत यावर सांगताना बाप्पा म्हणतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सृष्टीचा खेळ व्यवस्थित चालू रहावा म्हणून मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या रुपात कार्य करत असतो. हे ध्यानात घेतले तर त्यांच्या रुपात मीच नटलेला आहे हे लक्षात येईल. मी भक्तांचा चाहता असल्याने, त्यांनी केलेल्या उपासनेमुळे संतुष्ट होऊन त्यांनी मागितलेले फल त्यांच्या दृष्टीने हिताचे असल्यास मी त्यांना देतो. वस्तुत: कोणत्याही देवाची उपासना केली तरी ती माझीच उपासना असते. हे समजून घेणे यालाच अभेदबुद्धियोग म्हणजे बुद्धीचा भेद न करणारा योग किंवा बुद्धिभेद होऊन मनात शंका न उत्पन्न करणारा योग असं म्हणता येईल. तुकाराम महाराजांनी हा अभेदबुद्धियोग अचूक जाणला होता हे त्यांच्या अभंगातून लक्षात येते.

कोणत्याही शुभ कार्याची सुरवात श्रीगणेश पूजनाने होते. श्रीगणेश हे सर्वांचे आवडते दैवत असून तो बुद्धिदाता आहे. सध्या घरोघरी गणपतीचे आगमन झाले असून सर्वत्र हर्ष आणि उल्हासाचे वातावरण असून, त्याची आराधना करण्यात, सर्वजण गुंग आहेत. अशा ओंकार रूप गणेशाला माझा नमस्कार असो.

Advertisement

.