ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री
13 किंवा 14 ला शपथविधी, नेतेपती निवड
वृत्तसंस्था/श्रीनगर
नॅशनल कॉन्फरन्सच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी ओमर अब्दुल्ला यांची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी येथे झालेल्या या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावाला एकमुखाने पाठिंबा देण्यात आला. ते 13 किंवा 14 ऑक्टोबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासमवेत काही मंत्र्यांनाही शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. अब्दुल्ला यांना चार अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिल्याने या पक्षाची संख्या 46 झाली आहे.
काँग्रेसनेही प्रारंभिक विलंबानंतर नॅशनल कॉन्फरन्सला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. काँग्रेसला आम्ही एक दिवसाचा वेळ दिला आहे. या वेळेत त्या पक्षाने आम्हाला पाठिंब्याचे पत्र द्यायचे आहे, असे गुरुवारी सकाळी या पक्षाचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर काँग्रेसने अधिकृतरित्या पाठिंबा घोषित केल्याचे वृत्त आहे. काँग्रेसला विधानसभेत उपाध्यक्षपद मिळण्याची, तसेच एक किंवा दोन मंत्रीपदेही मिळण्याची शक्यता आहे.
युतीला बहुमत
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या युतीला बहुमत मिळाले आहे. या युतीला 90 जागांपैकी 48 जागा मिळाल्या असून त्यातील 42 नॅशनल कॉन्फरन्सच्या तर 6 काँग्रेसच्या आहेत. याशिवाय या युतीला चार अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पक्षाने जम्मू या हिंदुबहुल भागात आपले वर्चस्व राखले असून 29 जागा मिळविल्या आहेत. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी या पक्षाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
आश्वासनाचे काय होणार
आम्ही निवडून आल्यास घटनेचा 370 वा अनुच्छेद पुन्हा सक्रीय केला जाईल, असे आश्वासन नॅशनल कॉन्फरन्सने दिले होते. मात्र, या अनुच्छेदासंबंधीचा अधिकार विधानसभेचा नसून तो केवळ संसदेचा आहे. त्यामुळे या पक्षाला हे आश्वासन संसदेत विरोधी पक्षांना बहुमत मिळेपर्यंत पूर्ण करता येणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता ते आश्वासन कसे पूर्ण केले जाईल, असा प्रश्न आहे.
दुसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री
ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे यापूर्वीही मुख्यमंत्री होते. आता ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्या मंत्रीमंडळ रचनेसंबंधी चर्चा केली जात आहे. या मंत्रिमंडळाचे समीकरण कसे असेल हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. त्यांच्या समवेत प्रथम टप्प्यात चार ते पाच मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे.