लोकसभाध्यक्षपदी रालोआचे ओम बिर्ला
आवाजी मतदानाने जिंकली निवडणूक, पंतप्रधान मोदींकडून कौतुक, नेत्यांचा अभिनंदनाचा वर्षाव
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राजस्थानातील कोटा-बुंदी मतदारसंघातून सलग तिसऱ्या वेळी निवडून आलेले लोकसभा सदस्य ओम बिर्ला यांची अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बुधवारी लोकसभागृहात या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ध्वनिमताने त्यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्षांनी प्रत्यक्ष मतविभागणीची मागणी केली नाही. त्यामुळे ध्वनिमताचा निर्णय अंतिम ठरला. सतराव्या लोकसभेचे अध्यक्षही ओम बिर्ला हेच होते. अशाप्रकारे सलग दोनदा लोकसभाध्यक्ष झालेले ते संसदीय इतिहासातील पाचवे नेते ठरले आहेत.
विरोधी पक्षांच्या आघाडीने या पदासाठी आपला उमेदवार दिल्याने निवडणूक अटळ होती. अस्थायी अध्यक्ष भर्तृहरी मेहताब यांनी या निवडणुकीचे सूत्रसंचालन केले. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने या पदासाठी ओम बिर्ला यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेस नेते के. सुरेश हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. ध्वनिमताने ही निवडणूक झाल्यानंतर तिचा निकाल मेहताब यांनी घोषित केला.
नेत्यांनी नेले आसनापर्यंत
बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदीय व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी या तीन नेत्यांनी बिर्ला यांना त्यांच्या आसानापर्यंत नेले. तसेच, ‘आता हे आसन आपले आहे. आपण ते स्वीकारावे’ अशी परंपरेनुसार विनंती केली. त्यानंतर बिर्ला या आसनावर स्थानापन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
अभिनंदनाचा वर्षाव
ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर आता त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन केल्यानंतर त्यांच्या सरकारमधील इतर महत्वाचे मंत्री, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर अनेक पक्षांच्या नेत्यांनी बिर्ला यांचे कौतुक केले. ते नि:पक्षपातीपणे आपल्या उत्तरदायित्वाचे पालन करतील, असा विश्वास सर्व नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांचा प्रस्ताव
लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदनात सादर केला. त्याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अनुमोदन दिले. बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव संयुक्त जनता दलाचे नेते राजीव रंजन सिंग, हिंदुस्थान आवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी, शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनीही लोकसभेत सादर केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष तेलगु देसमनेही बिर्ला यांना या पदासाठी समर्थन देत असल्याची घोषणा आधीच केलेली होती.
कोटामध्ये आनंदोत्सव
सलग दुसऱ्यांना बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कोटा मतदारसंघात अनेक स्थानी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याच मतदारसंघात त्यांचे जन्मग्रामही आहे. तेथेही उत्सवी वातावरण होते. एकमेकांना मिठाई वाटून आणि फटाके वाजवून नागरिकांनी त्यांच्या निवडीचा आनंद व्यक्त केला. हा या मतदारसंघाचा सन्मान आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
भविष्याची चाहूलही...
सर्वसाधारणपणे लोकसभेच्या अध्यक्षांची निवड सर्वसहमतीने होते. मात्र, यावेळी तसे झाले नाही. अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेसने आपला उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे भविष्यात सत्ताधारी आघाडी आणि विरोधक यांच्यात कशाप्रकारे संघर्ष होणार आहे, याची चाहूल लागली. सत्ताधारी रालोआकडे स्पष्ट बहुमत आहे हे ज्ञात असूनही विरोधकांनी उमेदवार दिला, ही बाब महत्वाची मानली जात आहे. सरकारी पक्ष आणि विरोधक यांच्यात पदोपदी असा संघर्ष दिसून येणार आहे.
पहिल्याच ‘आणीबाणी’ प्रस्तावापासूनच वादंग
विरोधकांच्या गोंधळानंतरही सभागृहात चर्चा : ‘काळा अध्याय’ असल्याचा लोकसभाध्यक्षांचा दावा
लोकसभेच्या अध्यक्षपदी स्थानापन्न झाल्यानंतर ओम बिर्ला यांचा प्रथम प्रस्ताव 1975 मध्ये घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधातील होता. आणीबाणी तत्कालीन नेत्या इंदिरा गांधी यांनी पुकारली होती. त्या काळात देशातील जनतेचे सर्व घटनात्मक अधिकार पायदळी तुडविण्यात आले होते. हा भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळा अध्याय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या घटनेवरचा हा भीषण हल्ला होता, असे वक्तव्य बिर्ला यांनी या प्रस्तावाच्या माध्यमातून केले. आणीबाणीच्या काळात ज्यांना त्यावेळच्या सरकारच्या सूडबुद्धीमुळे त्रास सहन करावा लागला, त्यांच्यासाठी दोन मिनिटे स्तब्ध उभे रहावे, असेही प्रस्तावात आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे बहुतेक सर्व लोकसभा सदस्य आपल्या स्थानी उभे राहिले. तथापि, काँग्रेस आणि काही विरोधी पक्ष सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध करुन निषेध व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रस्तावासंदर्भात बिर्ला यांचे अभिनंदन केले. ‘बिर्ला यांनी आपल्या प्रस्तावात आणीबाणीचा तीव्र निषेध केला, याचा मला आनंद होत आहे,’ असा संदेश त्यांनी ‘एक्स’ या प्रसारमाध्यमावरुन प्रसारित केला. या घटनेमुळेही भविष्यकाळात सत्ताधारी आणि विरोधक कसे द्वंद्व होणार आहे याचे संकेत मिळाले.
अध्यक्षांचे योगदान महत्वाचे
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे लोकसभा सदस्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील. सदनाच्या कार्यवाहीत त्यांचे योगदान महत्वाचे असेल. मागच्या लोकसभेतही त्यांची कामगिरी अतुलनीय होती. या पदाचा पुन्हा स्वीकार केल्यानंतर त्वरित त्यांनी आणीबाणीचा निषेध करुन त्यांची लोकशाहीवरची दृढ निष्ठा प्रदर्शित केली आहे. लोकसभेचे कार्य त्यांच्या काळात अतिशय योग्य रितीने चालेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
नायडूंकडून अभिनंदन
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन करत असल्याचा संदेश पाठविला आहे. बिर्ला या पदावर राहून उच्च संसदीय परंपरांचे पालन करण्याचा आदर्श घालून देतील. आपल्या अधिकारांचा उपयोग ते निष्ठापूर्वक करतील असा आमचा विश्वास आहे. मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करीत आहे, असे नायडू यांनी संदेशात स्पष्ट केले आहे.
निलंबने होणार नाहीत...
ओम बिर्ला यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांच्या खासदारांना लोकसभेतून निलंबित केले जाणार नाही, अशी अपेक्षा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी व्यक्त केली आहे. मागच्या लोकसभेत विरोधी पक्षाच्या 100 हून अधिक प्रतिनिधींना सभागृहाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. त्यासंदर्भात अखिलेश यादव यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आवाज ऐकला जाईल...
बिर्ला यांच्या काळात लोकसभेत विरोधकांना बोलण्याची आवश्यक ती संधी दिली जाईल, तसेच त्यांचा आवाज ऐकला जाईल, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. सभागृह चालविण्याच्या कामात आम्ही आपल्याला सहकार्य करु. सरकारकडे राजकीय शक्ती आहे. तथापि, विरोधी पक्षही जनतेचे प्रतिनिधित्व करतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी अभिनंदन करताना व्यक्त केली.
नि:पक्षपातीपणाची अपेक्षा...
तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम आणि इतर विरोधी पक्षांनीही बिर्ला यांचे अभिनंदन केले. बिर्ला हे नि:पक्षपातीपणाने सभागृहाचे कामकाज चालवितील. विरोधी पक्षांना त्यांचे मुद्दे मांडण्याची संधी दिली जाईल. त्यांचा आवाज दाबला जाणार नाही, अशी अपेक्षा या पक्षांनी लोकसभाध्यक्षांकडून व्यक्त केली आहे.