अनुष अगरवालला ऑलिम्पिकचे तिकीट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जुलै महिन्यात होणाऱ्या 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अश्वदौड या क्रीडा प्रकारात अनुष अगरवाल भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. अनुषने अलिकडेच आशियाई क्रीडा स्पर्धेत अश्वदौड प्रकारात पदक मिळविले होते.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अश्वदौड ड्रेसेज या प्रकारात अनुष अगरवाल सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अगरवाल आणि श्रृती व्होरा यांच्यात चुरस निर्माण झाली होती. पण अनुषने व्होराला मागे टाकले. 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अनुष अगरवालने अश्वदौड सांघिक ड्रेसेज प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. तर वैयक्तिक ड्रेसेजमध्ये त्याने कांस्यपदक घेतले होते. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत फौद मिर्झाने अश्वदौड प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. तर 2000 च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत इम्तियाज अनिसने या क्रीडा प्रकारात भारतातर्फे आपला सहभाग दर्शविला होता.