ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारे खेळाडू तयार करा; पालक मंत्री हसन मुश्रीफ यांचे विद्यापीठाला आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाने स्वनिधीतून खेळाडूंसाठी वसतिगृह उभारले ही खेळाडूंच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. शिवाजी विद्यापीठातील खेळाडूंनी आतापर्यंत अनेक खेळांमध्ये सुवर्ण, रौप्य, सिल्व्हर पदके मिळवली आहेत. खेळाडूंना सुविधा देण्याबरोबर ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू तयार करा, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने खेळाडूंसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाचे भूमीपूजन व कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर खेलो इंडियामध्ये निवड झालेल्या खेळाडूंचा, महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात दुसऱ्या क्रमांकाची जनरल चॅपियनशिप मिळवल्याबद्दल खेळाडूंचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना सरकार थेट शासकीय नोकरी देते. खेळाडूंचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून अनेक संस्था मदत करीत असतात. याचा फायदा खेळाडूंनी घेवून ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवत शिवाजी विद्यापीठाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरावे. खेळाडूंच्या वसतिगृहाचे काम तीन टप्प्यात होणार आहे. विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सरकारने 50 कोटीचा निधी विद्यापीठाला दिला आहे. त्यातील उर्वरीत रक्कम लवकरच मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. तो मिळाला तर विद्यापीठाला त्या निधीचा फायदा होईल. शिवाजी विद्यापीठाने तलाव आणि विहरींच्या माध्यमातून स्वत:पाण्याची व्यवस्था केली आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या चमकदार कामगिरीची माहिती दिली. डॉ. एन. डी. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, जिल्हा बँकेचे संचालक व शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य प्रताप उर्फ भैय्या माने, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ. पी. टी. गायकवाड, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, किरण पाटील, अमर सासने, प्रशांत पाटील, प्रफुल मांगोरे-पाटील, सुभाष पवार, सर्व प्रशिक्षक, व्यवस्थापन सदस्य,
सोलरच्या माध्यमातून वीजनिर्मिती तयार करा
विद्यापीठातील एक जागा निवडून तिथे सोलर प्लांट उभा करा. जेणेकरून या सोलरच्या माध्यमातून स्वत:ची वीज तयार होईल. यातून विद्यापीठाचे पैसेदेखील वाचतील. जिल्हा नियोजन समितीमधूतन निधीची तरतूद करु,पण सोलरच्या माध्यमातून विद्यापीठाने वीजनिर्मिती केली पाहिजे.
संशोधनातून नवनिर्मिती करा
संशोधनासाठी विद्यापीठांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे संशोधन तयार नरून नाविन्यपूर्ण गोष्टीची निर्मिती करा. संशोधनाकडे लक्ष देवून सातत्याने नवनिर्मिती केली पाहिजे. संशोधनाकडे कुलगुरू विशेष लक्ष घालतील, अशी आशा आहे.