कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साडेतीन हजार किमीचा प्रवास करत ओडीसातील मादी कासव पोहोचले गुहागर समुद्रकिनारी!

12:50 PM Apr 19, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

ओडीसातील गहीरमठ सागरी किनारपट्टीवरुन फ्लिपर टॅग केलेले ऑलिव्ह रिडले कासव तब्बल 3,500 किलोमीटरचा टप्पा पार करत गुहागर किनारपट्टीवर आले आहे.

Advertisement

By : सत्यवान घाडे

Advertisement

गुहागर : भारताच्या पूर्व किनारपट्टीला असलेल्या ओडीसातील गहीरमठ सागरी किनारपट्टीवरुन फ्लिपर टॅग केलेले ऑलिव्ह रिडले कासव तब्बल 3,500 किलोमीटरचा टप्पा पार करत गुहागर किनारपट्टीवर आले आहे. 25 डिसेंबर 2024 रोजी गुहागरमधील कासव संवर्धन मित्रांनी ही बाब कांदळवन विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यावर या सर्व प्रवासाचा उलगडा झाला. यामुळे जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवर येणाऱ्या या कासवांच्या प्रवासाबाबतची अधिक माहिती मिळवण्यासाठी 31 जानेवारी रोजी जिल्ह्यातून 62 कासवांना फ्लिपर टॅगिंग करुन समुद्रामध्ये सोडण्यात आले असून यामध्ये गुहागरातील 59 मादी कासवांचा समावेश आहे.

भारताच्या पूर्व किनारपट्टीला असलेल्या ओडीसामधील गहीरमठ सागरी किनारपट्टीवर लाखो ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालण्यासाठी हजेरी लावतात. येथे एका मोसमामध्ये दीड कोटीचा आकडा पार केला आहे. गुहागर किनारपट्टीवर आलेल्या या कासवाबाबतची अधिक माहिती देताना कांदवळवन अधिकारी किरण ठाकुर यांनी सांगितले की, 'ओडीसामधील गहीरमठ किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले कासवाला संशोधक सुरेश कुमार यांनी 21 मार्च 2021 रोजी 03233 या नंबरचे फ्लिपर टॅगिंग करून समुद्रात सोडले होते.

या नंबरचे टॅगिंग असलेले ऑलिव्ह रिडले कासव 25 डिसेंबर 2024 रोजी रात्री गुहागर समुद्रकिनारी अंडी घालण्यास आलेले गुहागरातील कासवमित्रांनी पाहिले. या कासवाने 120 अंडी दिल्याचीही नोंद करत कांदळवन विभागाला ही बाब लक्षात आणून दिली. यातून या कासवाने 3 वर्षात 3,500 किलोमीटरचा समुद्र प्रवास करून गुहागरमध्ये आल्याचा उलगडा झाला. यामुळे ओडीसातील अशी अनेक कासवे गुहागर समुद्रकिनाऱ्यावर हजेरी लावत असलेल्याचे स्पष्ट झाले आहे. या कासवाने दिलेल्या 120 अंड्यांमधून 107 पिल्ले बाहेर आली असून ती समुद्रामध्ये सोडण्यात आली आहेत.

62 कासवांना केले फ्लिपर टॅगिंग

पूर्व किनारपट्टीवरील ओडीसा ते महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीवर हजेरी लावणाऱ्या या कासवांच्या प्रवासाचा तसेच ही कासवे एका मोसमात कितीवेळा अंडी देतात, या बाबतची अधिक माहिती मिळावी, यासाठी कांदळवन विभागाच्यावतीने 30 जानेवारी 2025 पासून आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवरून 62 अंडी घालणाऱ्या कासवांना फ्लिपर टॅगिंग करण्यात आल्याची माहिती कांदळवन अधिकारी किरण ठाकुर यांनी दिली. यामध्ये गुहागर समुद्रकिनारपट्टीवरील 59 कासवांना तर आंजर्लेत 2 कासव व वेळास येथील एका कासवाचा समावेश आहे.

या टॅगिंग केलेल्या कासवांनी गुहागर समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी हजेरी लावल्याचेही निदर्शनात आले आहे. याची नोंद करण्यात येत असून यामुळे टॅगिंग केलेली मादी कासवे कितीवेळ अंडी घालण्यास हजेरी लावतात, याची माहिती आता प्राप्त होणार आहे. मात्र यासाठी कासवमित्रांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील नियुक्त केलेले कासवमित्र चांगल्या पद्धतीचे काम करत असल्याचे किरण ठाकुर यांनी सांगितले.

कासव संवर्धन केंद्रात गुहागर समुद्रकिनाऱ्याचीही होणार नोंद

भारतातील 5 समुद्रकिनारपट्टीची ठिकाणे कासव संवर्धन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहेत. यात ओडीसामधील गहीरमठ बीच, ऋषीकुल्य बीच ओडीसा, दापोली तालुक्यातील वेळास बीच, लक्षद्वीपमधील अगत्ती आईसलँड, गोव्यातील मोरजीम बीच यांचा समावेश आहे. गुहागर समुद्रकिनारपट्टीवर जिल्ह्यातील सर्वाधिक कासवांची अंडी संरक्षित करून मोठ्या प्रमाणात कासव पिल्लांचा जन्म होत आहे. गेल्या 5 वर्षाचा हा आलेख वाढत आहे. यामध्येच ओडीसामधील मादी कासव येथे अंडी घालण्यास येत असल्याचे स्पष्ट झाले असून या प्रसिद्ध कासव संवर्धन केंद्रात गुहागर समुद्रकिनारपट्टीचीही लवकरच नोंद होणार आहे. गुहागर समुद्रकिनाऱ्यावरून या अगोदर 5 ते 6 कासवांना सॅटेलाईट ट्रान्स्मीटर बसवून परीक्षणासाठी समुद्रात सोडण्यात आले होते. तर आता तब्बल 59 कासवांना फ्लिपर टॅगिंग करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
@ratnagiri#guhagarnews#Odisha#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaGuhagar beacholive ridley tortoise
Next Article