इस्रायलनजीक सापडले ‘सर्वात जुने’ जहाज
3200 वर्षे जुना खजिना समुद्रातून काढला बाहेर
समुद्रात हजारो वर्षांपूर्वी बुडालेल्या एका जहाजाचा खजिना शोधण्यात आला आहे. हे जहाज इस्रायलच्या किनाऱ्यापासून उत्तर दिशेला सुमारे 2000 मीटर खोल समुद्रात आढळून आले. या जहाजाच्या अवशेषात खजिना सापडला असून त्याला एम्फोरा या नावाने ओळखले जाते. हा एम्फोरा सुमारे 3300 वर्षे जुना असू शकतो.
इस्रायलच्या किनाऱ्यापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर या जहाजाचा शोध लागला आहे. या जहाजाचा आकार 40 फूट इतका आहे. हे जहाज कांस्ययुगातील असल्याचे मानले जात आहे. मागील वर्षी या जहाजाला लंडनच्या एका गॅस कंपनीने समुद्रात रोबोटद्वारे करण्यात येणाऱ्या स्कॅनिंगदरम्यान शोधले होते.
भूमध्य समुद्रात आतापर्यंत इतक्या खोलवर सापडलेले हे सर्वात जुने जहाज असल्याचे मानले जाते. कांस्ययुगातील मागील जहाजांचे अवशेष कधीच मुख्य भूमीपासून इतक्या अंतरावर कधीच सापडले नव्हते. प्राचीन खलाशी खोल समुद्रात प्रवास करण्यास इतिहासकारांच्या कल्पनेपेक्षा अधिक सक्षम होते हे देखील यातून स्पष्ट होते. हे जहाज एक तर वादळ किंवा सागरी चाच्यांच्या हल्ल्यामुळे बुडाले असावे असे संशोधकांचे मानणे आहे. इस्रायल पुरातत्व प्राधिकरणाच्या सागरी शाखेचे प्रमुख जॅकब शारविट यांनी याला जागतिक स्तरावर इतिहास बदलणारा शोध ठरविले आहे.
समुद्रातून बाहेर काढला खजिना
जहाज वादळामुळे बुडाले असावे किंवा सागरी चाच्यांच्या हल्ल्यामुळे बुडाले असण्याची शक्यता आहे. हे जहाज कांस्ययुगाच्या अखेरीस अत्यंत प्रसिद्ध राहिले असावे असे शारविट यांनी म्हटले आहे. संशोधकांनी हे जहाज नेमके कुठे सापडले हे जाहीर करणे टाळले आहे. परंतु हे ठिकाण मुख्य भूमीपासून 90 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले आहे. जहाज अद्याप पाण्याखालीच आहे. परंतु संशोधकांनी समुद्रात असलेल्या या जहाजावरील खजिना बाहेर काढण्यास यश मिळाले आहे. याला एम्फोरा जग म्हटले जाते, याचा आकार अंडाकृती असतो. तेल, मद्य आणि फळे नेण्यासाठी याचा वापर केला जायचा.
मोठा शोध
गाळाने भरलेला तळ जहाजाच्या बहुतांश हिस्स्याला लपवत आहे. लाकडाचे बीम देखील गाळात गाडले गेले असल्याची शक्यता आहे. या शोधामुळे प्राचीन खलाशांची नेव्हिगेशन क्षमता प्रगत होती हे स्पष्ट होते. खलाशी भूमीनजीकच्या समुद्रातून नौका न्यायचे असे मानले जायचे, परंतु या शोधामुळे खलाशी खोल समुद्रातून प्रवास करायचे हे स्पष्ट झाले आहे. स्वत:ची दिशा जाणण्यासाठी सूर्य आणि ताऱ्यांचा वापर ते करत असावेत असे शारविट यांनी सांगितले आहे.