For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Radhanagari Crime News: वृध्द महिलेच्या खूनाचा छडा, दोघांना अटक, सात दिवसांची पोलीस कोठडी

05:14 PM Sep 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
radhanagari crime news  वृध्द महिलेच्या खूनाचा छडा  दोघांना अटक  सात दिवसांची पोलीस कोठडी
Advertisement

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राधानगरी पोलिसांची यशस्वी कारवाई

Advertisement

By : महेश तिरवडे

राधानगरी : पनोरी (ता. राधानगरी) येथील 73 वर्षीय वृध्द महिलेच्या खूनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राधानगरी पोलिसांनी संयुक्तरित्या तपास करत दोन आरोपींना अटक केली. श्रीमंती हरी रेवडेकर (वय 73) 7 सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झाल्यानंतर, तिचा मृतदेह गावातील गोबरगॅसमध्ये आढळून आला होता.

Advertisement

डोक्याला मारहाणीचे घाव असल्याने घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, या घटनेबाबत मृतदेह गोबरगॅसमध्ये टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपासाला वेग दिला. सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ व त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून, गावातील विसर्जन मिरवणूक, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीयतेच्या सहाय्याने तपास सुरु केला.

त्यानुसार या तपासात अभिजीत मारुती पाटील(वय 34) आणि कपिल भगवान पातले (वय 34) दोघेही रा. पनोरी यांच्यावर संशय गडद होत गेला. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आर्थिक अडचण असल्याने दोघांनी मयत महिला एकटी राहते आणि अंगावर दागिने असतात हे पाहून चोरीचा कट आखला होता.

अनंत चतुर्दशीच्या रात्री, गावातील नागरिक मिरवणुकीत व्यस्त असताना मागील दरवाजातून घरात प्रवेश केला. चोरीदरम्यान महिलेने विरोध केल्याने तिचा खून करून मृतदेह गोबरगॅसमध्ये टाकला. सध्या दोन्ही आरोपी राधानगरी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना न्यायालयात हजर केले.

त्यांना सात दिवसासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. कारवाईसाठी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चु, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार, सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, विनोद कांबळे, संजय देसाई, राजू कांबळे, विजय इंगळे राजेंद्र वरांडेकर, हंबीर अतिग्रे, प्रदीप पाटील राधानगरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक प्रणाली पवार, पोलीस अंमलदार पिंटू खामकर, शेळके, सुदर्शन पाटील, कोळी, रघुनाथ पोवार व देसाई यांच्या पथकाने अत्यंत कसून तपास करत गुन्हेगारांना अटक केल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.