विसर्जन मार्गावरील जुने ट्रान्स्फॉर्मर बदलले
हेस्कॉमकडून खबरदारीचा उपाय
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत विजेच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत, यासाठी हेस्कॉमकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. बुधवारी कपिलेश्वर परिसरात जुने ट्रान्स्फॉर्मर बदलून त्या ठिकाणी जादा क्षमतेचे नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम सुरू होते.
मंगळवारी हेस्कॉमचे शहर कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली होती. धोकादायक ट्रान्स्फॉर्मर, फिडर पिलर बॉक्स यांची माहिती घेऊन ते तात्काळ बदलण्याची सूचना केली होती. विसर्जन मिरवणुकीत नागरिकांची होणारी गर्दी तसेच विसर्जन मार्गावर पडणारा विजेचा भार यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
बुधवारी विसर्जन मार्गावरील ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. काही ट्रान्स्फॉर्मरमधून ठिणग्या व तेलगळती होत असल्याचे समोर येत असल्याने त्यांची दुरुस्ती करण्यात आली. काही ठिकाणी नवे ट्रान्स्फॉर्मर देखील बसविण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशभक्तातून समाधान व्यक्त होत आहे.