जुने गोवे ते गवंडाळी रस्ता वर्षभर वाहतुकीस बंद
पणजी : रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी गवंडाळी ते जुने गोवे हा रस्ता 25 फेब्रुवारी 2025 ते 19 जानेवारी 2026 पर्यंत म्हणजे सुमारे वर्षभर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वरील रस्त्याने नियमित ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची अडचण होणार असून त्यांनी पर्यायी मार्ग म्हणून बाणस्तारी पुलावरुन किंवा खोर्ली आयडीसी रस्त्यावरुन जाण्याची सूचना रेल्वे प्रशासनाने केली आहे. गवंडाळी येथे असलेल्या रेल्वे फाटकाजवळ हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.त्या पुलाची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करण्यात येत होती. रेल्वेची ये-जा होताना फाटक बंद करण्यात येत असल्याने दोन्ही बाजूना वाहनांची मोठी रांग लागते आणि वाहने बराच वेळ अडकून पडतात. त्यावर उपाय म्हणून हा उड्डाणपूल बांधण्याची योजना आहे. पुलाचे बांधकाम झाल्यावर वाहने पुलावरुन तर रेल्वे पुलाखालून जाणार असल्याने वाहतूक कोंडी सुटणार आहे. तथापि रस्ता बंद राहणार असल्याने वाहनचालकांना तेथे समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.