जुने गोवे - गवंडाळी रस्ता आजपासून वाहतुकीस बंद
पणजी : ओल्ड गोवा ते गवंडाळी हा रस्ता आज मंगळवार दि. 25 फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून तो सुमारे वर्षभर म्हणजे 19 जानेवारी 2026 पर्यंत बंद राहाणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी हा रस्ता बंद ठेवला जाणार असून ते काम पावसाळ्यातही चालू ठेवून लवकरात लवकर म्हणजे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण व्हावे म्हणून प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक आमदार राजेश फळदेसाई यांनी दिली आहे.
हा रस्ता बंद झाल्यानंतर वाहनचालकांचे त्रास वाढणार असून ते त्रास होऊ नयेत किंवा कमी व्हावेत म्हणून पर्यायी रस्ता करण्याचा विचार सुरू आहे. लोकांना आता बाणस्तारीमार्गाने यावे लागणार असून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता फळदेसाई यांनी वर्तवली आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकर व्हावे म्हणून ते युद्धपातळीवर करावे यासाठी प्रयत्न होतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कंत्राटदार कंपनीकडे याप्रकरणी चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असून रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 350 मीटर अंतरावर मिळून एकूण 700 मीटर लांबीचा सदर पूल होणार आहे. सर्व वाहने बाणस्तारी मार्गाने वळवण्यात आली असून दुचाकी वाहनांकरीता खोर्ली आयडीसीचा मार्ग खुला ठेवण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्था नीट राखण्यासाठी पोलिसांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून व्यवस्थापन आराखडा करण्यात येणार आहे.