For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवी ! रग्बी सेव्हन्स

06:00 AM Mar 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवी   रग्बी सेव्हन्स
Advertisement

रग्बी हा खेळ कित्येकांना माहीत असेल...पण ‘रग्बी सेव्हन्स’ माहित आहे का ?...हे ‘रग्बी युनियन’चं लहान भावंड. त्याची संकल्पना 1883 मध्ये स्कॉटलंडमधील मेलरोस येथे निधी उभारणीसाठी पुढं आणली ती नेड हेग नि डेव्हिड सँडरसन या दोन खाटिकांनी...

Advertisement

  • ‘रग्बी सेव्हन्स’ हा 15 खेळाडूंच्या संघाच्या रग्बीप्रमाणंच पूर्ण आकाराच्या मैदानावर खेळला जातो, परंतु नावावरून स्पष्ट होतं त्याप्रमाणं प्रत्येक संघात सात खेळाडू असतात. त्यापैकी तीन फॉरवर्ड आणि चार बॅक...
  • या खेळाच्या नियमांनुसार, पिवळं कार्ड मिळालेल्या कोणत्याही खेळाडूला दोन मिनिटांसाठी मैदान सोडावं लागतं, तर लाल कार्ड मिळाल्यास तो पुढं खेळू शकत नाही...
  • यात चेंडू हातानं पुढं पास केला जाऊ शकत नाही, तर बाजूनं नि मागं पास करण्याची मुभा राहते आणि पायानं चेंडू फटकावण्यासही परवानगी असते...
  • सामन्याच्या शेवटी सर्वाधिक गुणसंख्या असलेला संघ जिंकतो...एका ‘ट्राय’साठी म्हणजे चेंडू धावत घेऊन जायचं आणि प्रतिस्पर्ध्यांच्या गोल लाईनच्या पलीकडे मैदानाला चेंडूचा स्पर्श घडवायचा, यासाठी पाच गुण मिळतात. यावेळी चेंडू मैदानावर दाबून धरणं आवश्यक...
  • एका ‘कन्व्हर्जन’साठी दोन गुण मिळतात. ‘ट्राय’ची यशस्वीरीत्या नोंद केल्यानंतर ही संधी मिळते. यात गोललाईनपासून 20 मीटर अंतरावरून चेंडूला मैदानावर टाकून एक टप्पा पडल्यानंतर पायानं फटकावायचं असते. यावेळी चेंडू दोन्ही गोल पोस्टच्या मधून व आडव्या खांबावरून जाणं गरजेचं. तसं झाल्यास दोन गुण मिळतात...
  • प्रतिस्पर्ध्यांनी ‘फाऊल’ केल्यास ‘पेनल्टी’ मिळते. यावेळी चेंडू मैदानावरून दोन गोल पोस्टच्या मधून जाईल अशा बेतानं फटकावायचा असतो. त्यासाठी तीन गुण मिळतात...
  • ‘ड्रॉप गोल’साठीही तीन गुण दिले जातात. यात सामन्यादरम्यान कधीही पायानं चेंडू फटकावून तो गोल खांब्यांच्या मधून जाईल याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आधी चेंडू जमिनीवर टाकून एक टप्पा पडल्यानंतर फटकावणं मात्र आवश्यक...
  • रग्बी सेव्हन्सचा सामना 14 मिनिटांचा असतो, ज्यामध्ये प्रत्येकी सात मिनिटांची दोन सत्रं असतात...
  • ऑक्टोबर, 2009 मध्ये कोपनहेगन इथं झालेल्या 121 व्या सत्रात आंतरारष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सदस्यांनी रिओ, 2016 च्या ऑलिंपिक कार्यक्रमात ‘रग्बी सेव्हन्स’ला सादर करण्याच्या बाजूनं मतदान केलं. रिओमध्ये ऑस्ट्रेलियानं महिलांचं विजेतेपद पटकावलं, तर फिजीच्या पुऊषांनी या माध्यमातून सदर राष्ट्राला पहिलं ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवून दिलं...
  • 2020 साली टोकियोत व गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्येही हा खेळ झळकला...पॅरिसमध्ये पुरुष गटात फ्रांसनं, तर महिलांच्या गटात न्यूझीलंडनं सुवर्ण पटकावलं...

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.