खेळ जुनाच ओळख नवी : ‘फॉर्म्युला काईट’
06:00 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
‘फॉर्म्युला काईट’...नावात ‘काईट’चा उल्लेख असल्यानं हा पतंगांचा खेळ की काय असा विचार मनात आला असेल, तर ते चुकीचं. हा आहे ‘सेलिंग’चा म्हणजेच नौकानयनाचा एक प्रकार. गेल्या वर्षी पॅरिसमधून त्यानं पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये पाऊल ठेवलं अन् पुरुष नि महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा होऊन त्यात प्रत्येकी 20 खेळाडूंचा समावेश राहिला...
Advertisement
- ऑलिंपिकमधील सर्वांत वेगवान खेळ म्हणून ‘फॉर्म्युला काईट’कडे पाहिलं गेलं...ऑलिंपिकसाठी निवडलेली खेळाची ‘हाय-स्पीड फॉइलिंग’ आवृत्ती ही विविध ‘काईटबोर्डिंग’ प्रकारांतून विकसित झालीय. यापैकी काहींमध्ये ‘रायडर्स’ हवेत उड्या देखील मारतात....
- या खेळात सुरक्षिततेसाठी हेल्मेट परिधान करणारे खेळाडू पायांसाठी पट्ट्या असलेल्या लहान बोर्डवर उभे राहतात आणि ‘फॉइल’च्या आधारे पाण्यावरून सफर करतात...ते एक ‘हार्नेस’ (पट्टा) वापरतात, ज्याच्या आधारे ते मागे झुकतात. त्यांचे बोर्ड कधी कधी अशक्यप्राय वाटणाऱ्या कोनांत वळतात. कारण ते प्रसंगी ताशी 80 किलोमीटर (50 मैल) इतक्या वेगानं सफर करतात...
- बोर्डला खाली एक लांब ‘किल’ (धातूचा लांब तुकडा, जो बोर्डला बाजूने पाण्यात कलण्यापासून रोखण्यास मदत करतो) जोडलेला असतो त्याच्या तळाशी ‘फॉइल’ (पंखासदृश धातूची वस्तू) असते, जी बोर्डला पाण्याच्या वर राहण्यास मदत करते. शिडावर नियंत्रण ‘कंट्रोल बार’नं ठेवलं जातं...
- इतर नौकानयन स्पर्धांप्रमाणं या प्रकारातील खेळाडू एकमेकांच्या संपर्कात येऊन गोंधळ उडू नये किंवा त्यांना चालना देणारं मोठ्या आकाराचं, चमकदार रंगाचं शिड पाण्यात कोसळून नये याची काळजी घेत एका मार्गावर शर्यत करतात...काही नौकानयन प्रकारांप्रमाणं यातील किट एकाच डिझाइनचं नसतं. स्पर्धक मान्यताप्राप्त उपकरणांमधून निवड करू शकतात...
- या स्पर्धेचं स्वरूप काही पारंपरिक नौकानयन श्रेणींपेक्षा थोडं वेगळं...सुऊवातीला रायडर्स प्रारंभीच्या फेरीत स्पर्धा करतात, ज्यात उद्देश शक्य तितकं उच्च स्थान मिळविणं हे राहतं. ‘ओपनिंग सिरीज’च्या शेवटी आघाडीचे दोन रायडर्स आपोआप फायनलसाठी पात्र ठरतात, तर तिसऱ्या ते दहाव्या क्रमांकापर्यंचे नौकानयनपटू सेमीफायनलमध्ये पोहोचतात...
- सेमीफायनलमध्ये उर्वरित आठ रायडर्सना दोन भागांत विभागलं जातं. यात ध्येय तीन शर्यती जिंकण्याचं असतं. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील खेळाडू सेमीफायनलची सुऊवात करतात तेच खात्यात जिंकलेल्या दोन शर्यती घेऊन, तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या खेळाडूंच्या भात्यात एक विजय आधीच जमा असतो...म्हणून जर तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूनं सेमीफायनलची पहिली शर्यत जिंकली, तर ते फायनलमध्ये त्याचं स्थान निश्चित करण्यासाठी पुरेसं ठरतं...
- प्रत्येक सेमीफायनलमधून एक रायडर पात्र ठरतो, ज्यामुळं ग्रँड फायनलमध्ये अंतिम चार खेळाडू राहतात...येथेही स्वरुप वरीलप्रमाणंच राहतं. टॉप सीड सुऊवात करतो तीच जिंकलेल्या दोन शर्यती, तर दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू जिंकलेली एक शर्यत खात्यात घेऊन...पुन्हा एकदा ध्येय तीन शर्यती जिंकण्याचं असतं. एखाद्यानं ते साध्य करताच स्पर्धा संपते. फायनल एक ते सहा शर्यतींपर्यंत चालते...
-राजू प्रभू
Advertisement
Advertisement