For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवी ! अमेरिकन फुटबॉल

06:00 AM Nov 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवी   अमेरिकन फुटबॉल
Advertisement

अमेरिकन फुटबॉल...नावाप्रमाणेच ही फुटबॉलची अमेरिकी आवृत्ती. याला अमेरिकेच्या बाहेर ‘ग्रिडिरॉन’ देखील म्हणतात...तो ‘फुटबॉल’ किंवा ‘सॉकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय जागतिक खेळापेक्षा बराच वेगळा. हा खेळ ‘रग्बी’मधून विकसित झाला. 6 नोव्हेंबर, 1869 रोजी प्रिन्सटन आणि रटगर्स यांच्यात अमेरिकन फुटबॉलचा पहिला सामना खेळला गेला...हा प्रकार जगभरात खेळला जातो, परंतु युरोप, जपान आणि खास करून उत्तर अमेरिकेत तो प्रचंड लोकप्रिय...

Advertisement

  • अमेरिकन फुटबॉल हा रग्बीप्रमाणं एकमेकांना भिडून खेळण्याचा खेळ. यात चेंडू धरून किंवा पास करत धावण्यावर भर असतो आणि गुण मिळविण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या गोलक्षेत्रात पोहोचण्याचा प्रयत्न असतो...
  • प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात आणि संघ सर्वसाधारणपणे ‘अॅटेकर्स’, ‘डिफेन्स’ आणि ‘स्पेशल टीम प्लेयर्स’ अशा तीन गटांमध्ये विभागलेला असतो...
  • दोन संघ आयताकृती मैदानावर उतरतात. हे मैदान 110 मीटर लांब आणि 48.76 मीटर ऊंद असतं अन् प्रत्येक टोकाला गोलपोस्ट असतात. मैदानाच्या शेवटी ‘एंड झोन’ आणि त्यांची लांबी अंदाजे 20 यार्ड...
  • मैदानात प्रत्येक 10 यार्ड अंतरावर रेषा रेखाटलेल्या असतात. ‘एंड झोन’मध्ये पोहोचण्यापूर्वी किती अंतर कापावे लागेल हे त्यातून सूचित होतं...चेंडूचा आकार हा फुटबॉलसारखा गोल नव्हे, तर अंडाकृती...
  • अमेरिकन फुटबॉलचा सामना हा 60 मिनिटांचा असतो आणि प्रत्येकी 15 मिनिटांच्या चार सत्रांमध्ये तो विभागला जातो. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी किमान ‘फुटबॉल हेल्मेट’ आणि ‘शोल्डर पॅड्स’ यांची आवश्यकता असते...
  • अमेरिकन फुटबॉलमध्ये संघाचा उद्देश निर्धारित वेळेत प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त गुण मिळविण्याचा असतो. यासाठी त्यांना टप्प्याटप्प्यानं चेंडू मैदानात पुढं सरकवून शेवटी ‘टचडाऊन’साठी तो ‘एंड झोन’मध्ये पोहोचवावा लागतो...
  • चेंडू 10 यार्ड वा त्याहून पुढे नेण्यासाठी प्रत्येक संघाला 4 संधी (डाउन्स) मिळतात. यासाठी ते चेंडू फेकू शकतात किंवा चेंडू घेऊन धावू शकतात...एकदा त्यांनी 10 यार्ड पार केले की, आणखी 10 यार्ड अंतर कापण्यास सुरुवात होते. 4 ‘डाऊन्स’ झाले आणि 10 यार्ड्सपेक्षा जास्त अंतर पार करण्यात संघ अपयशी ठरला, तर चेंडू प्रतिस्पर्ध्याकडे जातो...
  • जेव्हा एखादा खेळाडू ‘टचडाउन’ची नेंद करतो तेव्हा त्यांच्या संघाला सहा गुण दिले जातात. चेंडू ‘एंड झोन’मध्ये घेऊन गेल्यास किंवा ‘एंड झोन’मध्ये असताना चेंडू पासद्वारे मिळाल्यास या ‘टचडाउन’ची नोंद होते...‘टचडाउन’नंतर आक्रमण करणाऱ्या संघाला चेंडू किकद्वारे फटकावून अतिरिक्त गुण कमावण्याची संधी मिळते. मात्र यशस्वी किकसाठी चेंडू दोन गोलखांब्यांमधून जाणं आवश्यक...
  • ‘मैदानी गोल’ मैदानातून कुठूनही, केव्हाही करता येतो. सर्वसाधारणपणे हा प्रयत्न अंतिम ‘डाउन’वर केला जातो आणि किक यशस्वी ठरल्यास तीन गुण मिळतात...याखेरीज ‘सेफ्टी’ या प्रकारात बचाव करणारा संघ स्वत:च्या ‘एंड झोन’मध्ये आक्रमण करणाऱ्या संघाला अडविण्यात यशस्वी ठरल्यास त्यासाठी 2 गुण मिळतात...
  • अमेरिकन फुटबॉल हा उत्तर अमेरिकेतील सर्वांत लोकप्रिय क्रीडाप्रकार. तेथील व्यावसायिक लीग (उदाहरणार्थ ‘एनएफएल’) जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना आकर्षित करते. तेथील ‘सुपर बाउल’ स्पर्धा म्हणजे या खेळाचं शिखर...

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.