शिक्षणाधिकारी कार्यालयातील जुनी इमारत हटविली
वाहने पार्किंगसाठी उपलब्ध केली जागा
बेळगाव : क्लब रोड येथील सार्वजनिक शिक्षण विभागाच्या कार्यालयातील जुनी इमारत अखेर पाडविण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून वापरात नसलेली जुनी इमारत अडथळा ठरत असल्याने ती जमीनदोस्त करून त्याठिकाणची जागा आता पार्किंगसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे यापुढे शिक्षक, तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मुख्य रस्त्यावर वाहनांना पार्किंग करावे लागणार नाही. मागीलवर्षीच्या पावसाळ्यात जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या छताला गळती लागल्याने कर्मचाऱ्यांना छत्र्या घेऊन काम करावे लागल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाला जाग आली.
जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांनी कार्यालयाला भेट देऊन नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून मागील सहा महिन्यांपासून शिक्षणाधिकारी कार्यालयात नूतनीकरणाचे काम सुरू आहे. नवीन छत, फरशी बसविणे, तसेच फर्निचरचे काम करण्यात आले. जुन्या इमारतीला धक्का न लावता अंतर्गत भागात नूतनीकरण करण्यात आले. कार्यालयाच्या उजव्या बाजूला एक जुनी इमारत होती. वापर होत नसल्यामुळे त्यामध्ये जुने साहित्य टाकण्यात आले होते. विनाकारण इमारत पडून असल्याने, तसेच धोकादायक बनल्याने ती हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. चार दिवसांपूर्वी इमारत हटवून ती जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.