सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वृद्धाश्रम?
दोन वर्षात 152 वृद्ध भोगताहेत अनाथपण : आई-वडिलांना घरी नेण्याकडे अपत्यांचे दुर्लक्ष
बेळगाव : आपल्या मुलांचे आयुष्य घडविण्यासाठी स्वत:च्या आशा, आकांक्षावर पाणी फेरणाऱ्या आई-वडिलांना उतारवयात चांगली वागणूक मिळते का? ज्या मुलांसाठी त्यांनी आपले आयुष्य घालविले, ती मुले त्यांचा सांभाळ करतात का? आदी प्रश्नांवर अधूनमधून चर्चा होत असते. सारेच आपल्या आई-वडिलांना टाकून देतात असेही नाही. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना वृद्धाश्रमात धाडण्याचे प्रकार वाढले आहेत. आता तर एका नव्या प्रकाराने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.
उपचारासाठी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणाऱ्या वृद्धांना आजारातून ते बरे झाल्यानंतर त्यांना घरी नेले जात नाही. आणखी थोडे दिवस त्यांना तेथेच राहू द्या, ही मनस्थिती वाढीस लागल्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. गेल्या दोन वर्षात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 152 वृद्धांना उपचाराअंती घरी नेण्यात आले नाही. उपचारानंतरही त्यांना तेथेच ठेवण्यात आले आहे. ही आकडेवारी थक्क करणारी आहे. आपला मुलगा किंवा मुलगी आजारी पडली तर आई-वडील त्यांना बरे करण्यासाठी रात्र जागवितात. दवाखान्यांच्या पायऱ्या झिजवितात, औषधोपचार करून त्यांना बरे करतात. हेच आई-वडील ज्यावेळी उतारवयात आजारी पडतात, त्यावेळी त्यांना आधार ठरण्याऐवजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून नंतर तेथून निघून जाणाऱ्या अपत्यांची संख्या वाढली आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अनुभव वेगळाच आहे. उपचारासाठी दाखल केल्यानंतर मालमत्तेच्या कागदपत्रावर सह्या घेण्यासाठी मुले हॉस्पिटलला येतात. कागदपत्रांवर एकदा सही झाली की ते तेथून निघून जातात. यापैकी सारे अपत्य गरीबच आहेत, त्यांना आपल्या आई-वडिलांना सांभाळता येत नाही असेही नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, जे व्यवस्थितपणे त्यांचा सांभाळ करू शकतात. अशाच अपत्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरविल्याच्या घटना घडल्या आहेत.
ही परिस्थिती काही नवी नाही. बिम्सची स्थापना होण्याआधी केवळ गरीब वृद्ध अनेक महिने काही जण अनेक वर्षे सिव्हिलमध्ये रहात होते. आता खासगी इस्पितळात ज्यांच्यावर उपचार करण्याची क्षमता आहे तेही सिव्हिलमध्ये आपल्या वृद्ध माता-पित्यांना दाखल करून आपली जबाबदारी झटकताना दिसत आहेत. एकदा दाखल केल्यानंतर हे अपत्य परत सिव्हिल हॉस्पिटलकडे फिरकत नाहीत. त्यांचा व्यवस्थित पत्ताही दिला जात नाही. दाखल करताना जो मोबाईल दिलेला असतो नंतर तो बंद ठेवण्यात आलेला असतो. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटललाही वृद्धाश्रमाचे स्वरुप प्राप्त होत आहे.
केवळ बेळगावच नव्हे परराज्यातील नागरिकांनाही या इस्पितळात दाखल केले जाते. परराज्यातील 17 व कर्नाटकातील 23 जणांच्या मुलांचा शोध घेऊन पोलिसांच्या मदतीने बिम्स प्रशासनाने त्यांना त्यांच्या घरांपर्यंत पोहोचविले आहे. सध्या 62 ज्येष्ठ नागरिक कुटुंब, अपत्य असूनही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनाथांचे जीवन जगत आहेत. यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोक शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.