‘ओला’चा आयपीओ खुला
2 ते 6 ऑगस्ट दरम्यान बोली लावण्याची गुंतवणूकदारांना संधी
वृत्तसंस्था/ मुंबई
ओला इलेक्ट्रिक कंपनीचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणजेच आयपीओ शुक्रवारी खुला झाला आहे. संबंधीत आयपीओ घेण्यासाठी आता गुंतवणूकदारांना 6 ऑगस्टपर्यंत बोली लावण्याची संधी मिळणार आहे. कंपनीचे समभाग हे 9 ऑगस्ट रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) वर सूचिबद्ध होणार आहेत. यासह, ही पहिली सूचीबद्ध इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी बनण्याचा मान पटकावणार आहे.
कंपनीला या इश्यूद्वारे 6,145.56 कोटी उभे करायचे आहेत. यासाठी, कंपनी 5,500 कोटी किमतीचे 723,684,210 नवीन शेअर्स जारी करत आहे. तर, कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार 645.56 कोटी किमतीचे 84,941,997 शेअर्स ऑफर फॉर सेल म्हणजेच आयपीओद्वारे विकत आहेत.
रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव इश्यूचा 10 टक्के हिस्सा
कंपनीने पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी इश्यूचा 75 टक्के राखीव ठेवला आहे. याशिवाय, सुमारे 10 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे आणि उर्वरित 15 टक्के हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.
किमान व कमाल किती रक्कम गुंतवता येईल?
ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या आयपीओसाठी 72-76 रुपये प्रति समभाग ही किमत निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच 195 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. आयपीओच्या 76च्या वरच्या प्राइस बँडवर 1 लॉटसाठी अर्ज केल्यास, गुंतवणूकदारांना 14,820 ची गुंतवणूक करावी लागेल.
त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी म्हणजेच 2535 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. यासाठी गुंतवणूकदारांना अप्पर प्राइस बँडनुसार 192,660 ची गुंतवणूक करावी लागेल.