ओलाची एस1 एक्स, एस1 प्रो ई स्कूटर लाँच
पूर्ण चार्जवर गाडी 320 किमी धावणार : किंमत 79,999 पासून होणार सुरु
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिग्गज ईव्हीच्या दुचाकी वाहनांची निर्मिती करणारी कंपनी ओला इलेक्ट्रिक स्कूटरने शुक्रवारी त्याच्या एस 1 या मालिकेतील इलेक्ट्रिक स्कूटरचे सुधारीत मॉडेल सादर केले आहे. कंपनीने भारतीय बाजारात दोन तिसऱ्या पिढीतील ईव्ही स्कूटर सादर केल्या आहेत. यामध्ये एस1 एक्स आणि एस1 प्रो या मॉडेलचा समावेश राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
तिसऱ्या पिढीतील एस1 एक्स ही गाडी चार बॅटरी पॅकसह उपलब्ध होणार आहे. याची एक्स शोरुम किंमत ही 79,999 रुपयांपासून सुरु होते. जी टॉप मॉडेल एस1 एक्स प्लससाठी 1.07 लाख रुपयांपर्यंत जाते. दरम्यान एस 1 प्रो चार प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. याची एक्स शोरुम किंमत ही 1.14 लाख रुपयांपासून सुरु होते. ज्यामध्ये टॉप मॉडेलची किंमत ही 1.69 लाख रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे.
दमदार देणार मायलेज
कंपनीने दावा केला आहे, की 5.3 केडब्लूएच बॅटरी पॅक असलेले फ्लॅगशिप एस1 प्रो प्लस मॉडेल हे एकदा चार्ज केल्यावर ते 320 किमी इतके मायलेज देणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. एस1 एक्स हे पूर्ण चार्जनंतर 242 किमी धावणार असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. या गाडीची डिलिव्हरी फेब्रुवारीच्या मध्यावर सुरु होणार असल्याचे समजते.