‘ओला’ कर्मचारी कपात करणार
बेंगलोर :
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड 1,000 हून अधिक कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. कंपनी याद्वारे आपला वाढता तोटा कमी करू इच्छित आहे. या नोकऱ्या कपातीमुळे खरेदी, पूर्तता, ग्राहक संबंध आणि चार्जिंग पायाभूत सुविधांसह अनेक विभागांवर परिणाम होईल. या प्रकरणाशी परिचित असलेल्यांनी सांगितले की ही कपात ओला इलेक्ट्रिकच्या खर्च नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, असे ब्लूमबर्गच्या अहवालानूसार सांगण्यात आले आहे. नोव्हेंबर 2023 च्या सुरुवातीला, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की ओला इलेक्ट्रिकने मार्जिन वाढवण्यासाठी आणि नफा कमावण्याच्या शक्यता सुधारण्यासाठी पुनर्रचना प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुमारे 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
ओलाचे 5 टक्के समभाग घसरले
कपातीच्या बातमीनंतर ओलाचे समभाग हे 5 टक्क्यांनी घसरले आहेत. राष्ट्रीय समभाग बाजारात ते 54 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. गेल्या 6 महिन्यांत हा शेअर सुमारे 52 टक्क्यांनी प्रभावीत झाला आहे.
ओलाचा तोटा 50 टक्क्यांनी वाढला
2024-25 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने 564 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा नोंदवला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 376 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. वार्षिक आधारावर कंपनीचा तोटा 50 टक्क्यांनी वाढला आहे.