ओला इलेक्ट्रीकच्या दुचाकी विक्रीत घसरण
स्पर्धात्मक कंपन्यांची हिस्सेदारी वाढली : 23 हजारहून अधिक दुचाकीविक्री
नवी दिल्ली :
इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या ओला इलेक्ट्रिकने सप्टेंबरमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी दुचाकींची विक्री केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यायोगे कंपनीची बाजारातील हिस्सेदारी कमी होताना दिसत आहे.
सरकारी आकडेवारीनुसार सॉफ्ट बँकचा पाठिंबा असणाऱ्या ओला इलेक्ट्रिकला छोट्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी चांगलीच टक्कर दिली असल्याचे समजून आले आह.s
टीव्हीएस, बजाजची मजबूत कामगिरी
ओला इलेक्ट्रिकने दोन महिने आधी शेअर बाजारामध्ये प्रवेश केला होता. सप्टेंबरमध्ये 23 हजार 965 दुचाकींची विक्री करण्यात आली असून सलग दुसऱ्या महिन्यामध्ये दुचाकी विक्रीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. याच दरम्यान ओलाची प्रतिस्पर्धी कंपनी टीव्हीएस मोटर यांनी या महिन्यामध्ये बाजारातील हिस्सेदारी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच बजाज ऑटोने देखील सलग तीन महिन्यांमध्ये बाजारातील हिस्सेदारीमध्ये वाढ करण्यामध्ये यश मिळवले आहे.
अडचणींचा सामना
ओला इलेक्ट्रिकने बाजारातील इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये आपल्या दुचाकींची विक्री कमी किमतीला केली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या विक्रीतील घसरणीमुळे त्याचा परिणाम तिमाही निकालावर होऊ शकतो. ओलाच्या तुलनेमध्ये इतर कंपन्यांनी सुद्धा आपल्या नव्या मॉडेल्स बाजारात सादर केल्याने त्यांच्याशी ओलाला चांगली स्पर्धा करावी लागते आहे. अलीकडच्या काळामध्ये सेवा अर्थात सर्व्हिसबाबत तक्रारही ग्राहकांची वाढली असल्याने त्याचाही फटका कंपनीला बसला आहे.
विक्रेते वाढवण्यावर भर
दुसरीकडे इतर कंपन्यांनी बाजारातील हिस्सेदारी वाढवण्यासाठी डीलरशिप जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे. बजाजने गेल्या वर्षी चेतक इ-स्कूटरसाठी विक्रेत्यांची संख्या शंभरहून जूनपर्यंत 500 पर्यंत वाढवली आहे तर ओलाची विक्रेत्यांची संख्या 750 नंतर आठशेपर्यंत मर्यादित राहिली आहे.