‘ओला इलेक्ट्रिक’ 25,000 नोकऱ्या देणार
तामिळनाडूत कारखाना :सीईओ अग्रवाल
नवी दिल्ली
तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिह्यात ओला इलेक्ट्रिकचे नवीन ईव्ही उत्पादन कारखान्याचे काम सुरु असून ते पूर्ण प्रमाणात सुरु झाल्यानंतर सुमारे 25,000 लोकांना रोजगार देण्यात येणार असल्याचे ओला या कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी तामिळनाडू ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीटमध्ये ही माहिती दिली.
भाविश अग्रवाल म्हणाले, ‘उत्पादन क्षमतेव्यतिरिक्त, 2000 एकरमध्ये पसरलेल्या या ईव्ही केंद्रामध्ये विक्रेता आणि पुरवठादार नेटवर्कदेखील राहणार आहे. आम्ही मिळून तामिळनाडू आणि भारताला ईव्हीचे जागतिक केंद्र बनवू. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
फेब्रुवारीत उत्पादनास प्रारंभ
आम्ही फक्त आठ महिन्यांत तामिळनाडूमध्ये भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादन सुविधा तयार करू शकलो आहोत. पुढील महिन्यापासून येथे दुचाकीचे उत्पादन सुरू होईल. आम्ही हे देखील विक्रमी वेळेत सुरू करत आहोत. हे फक्त भारत आणि तामिळनाडूमध्येच शक्य होणार असल्याचे सीईओंनी म्हटले आहे.
गिगाफॅक्टरी दरवर्षी 1 कोटी दुचाकी बनवेल
भाविश म्हणाले की, ही भारतातील पहिली गिगाफॅक्टरी असेल. जेव्हा ती पूर्ण क्षमतेने सुरु होईल, तेव्हा येथे दरवर्षी सुमारे 1 कोटी दुचाकी तयार होतील, अशी अपेक्षा आहे.