ओला इलेक्ट्रिक 4000 स्टोअर्स सुरु करणार
वृत्तसंस्था/ मुंबई
इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलीटी लिमीटेड आगामी काळामध्ये 4 हजारहून अधिक स्टोअर्स देशभरामध्ये सुरु करणार आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
सध्या 800 इतकी स्टोअर्स कार्यरत असून कंपनी येत्या एक महिन्यामध्ये स्टोअर्सची संख्या 4000 पर्यंत वाढविणार आहे. व्यावसायिक विस्ताराच्या ध्येयासाठी कंपनी नवीन स्टोअर्स सुरु करत आहे. ग्राहकांना याचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा व त्यांना दुचाकीबाबतची योग्य ती सेवा मिळावी हाच उद्देश यामागे असणार आहे. 20 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये वरील सर्व स्टोअर्स खुली होणार आहेत.
या बातमीनंतर ओलाचे समभाग शेअर बाजारामध्ये 6 टक्के वाढत 93 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 5 दिवसांमध्ये समभागाने 30 टक्क्यांची तेजी अनुभवली आहे. 9 ऑगस्ट रोजी कंपनीचा समभाग शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध झाला होता. कंपनीचे बाजार भांडवल 39.20 हजार कोटी रुपये इतके झाले आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 6145 कोटी रुपयांची उभारणी केली होती.