ओला इलेक्ट्रिकचे समभाग घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
इलेक्ट्रिक दुचाकीच्या सर्व्हिसबाबत तक्रारींच्या वाढत्या सुरामुळे ओला इलेक्ट्रिकचे समभाग सोमवारी शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात घसरणीत राहिले होते. रविवारी ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल आणि हास्यकलाकार कुणाल कामरा यांच्यामध्ये ट्वीटरवर वाक्युद्ध रंगले होते. एक्स.कॉम या ट्विटरवर रविवारी दिवसभर या प्रकरणाची चर्चा रंगली होती.
कामरा यांनी ट्विटरवर ‘गेल्या चार महिन्यापूर्वी गाडी खरेदी केलेल्या ग्राहकांचे 100 टक्के पैसे परत देणार नाही ना तुम्ही. माझेच पैसे मला मिळाले नाहीत, तर इतर ग्राहकांना काय मिळणार? असा उपरोधीक टोमणा भाविश अगरवाल यांना मारला. यावर प्रत्युत्तरादाखल संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ट्विट करताना, ‘कॉमेडियन बनता आले नाही म्हणून चौधरी बनायला निघाले. पुढील वेळेला पूर्ण अभ्यास करून येणे. माझी सेवाकेंद्रे पूर्णवेळ खुली असून तेथे येऊन आव्हान स्वीकारावे, असे त्यांनी म्हटले. याबाबत दिवसभरामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटलेल्या पहायला मिळाल्या.
समभागावर परिणाम
कंपनीचा समभाग 9 ऑगस्ट रोजी सपाट स्तरावर बाजारात लाँच झाला होता. त्यानंतर या समभागाने तीन दिवसात 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट नोंदवले होते. 157 रुपयांच्या भावानंतर समभाग 74 टक्क्यांपर्यंत घसरला. आयपीओच्या माध्यमातून 6154 कोटी कंपनीने उभारले आहेत. या दरम्यान या सर्व ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे समभाग सोमवारी इंट्रा डे दरम्यान 9 टक्क्यांपर्यंत घसरत 90.26 रुपयांवर खाली आलेले पहायला मिळाले. त्यांच्या उत्पादनांबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. याचा फायदा या क्षेत्रातील इतर इलेक्ट्रीक दुचाकी कंपन्या उठविताना दिसत आहेत.