ओला इलेक्ट्रिकची बाजारात सर्वाधिक हिस्सेदारी
41 टक्के वाटा हस्तगत: टीव्हीएसची विक्रीत प्रगती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओला इलेक्ट्रिक कंपनीने भारतीय बाजारामध्ये 41 टक्के इतका मजबूत वाटा उचलला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या स्पर्धेत अॅथरला टीव्हीएसने मागे टाकले आहे.
मागच्या महिन्यामध्ये कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे 5500 कोटी रुपयांच्या आयपीओकरिता रितसर अर्ज दाखल केला आहे. सदरच्या कंपनीने भारतात दुचाकी बाजारामध्ये 41 टक्क्यांपेक्षा अधिकची हिस्सेदारी प्राप्त केली आहे. मागच्या महिन्यामध्ये 30,219 गाड्यांची नोंदणी ग्राहकांनी केली असून ही कॅलेंडर वर्षातली सर्वाधिक असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. विक्रीतील ही सर्वोच्च कामगिरी प्रतिस्पर्धी कंपन्या टीव्हीएस, बजाज आणि अॅथर यांना मिळालेल्या नोव्हेंबरमधील नकारात्मक प्रतिसादामुळे साध्य करता आली असल्याचेही सांगितले जात आहे.
नोव्हेंबरमध्ये ओलाची बाजारातील हिस्सेदारी 33 टक्के इतकी होती तर या तुलनेमध्ये बजाज आणि टीव्हीएस यांची सामूहिकदृष्ट्या हिस्सेदारी 34 टक्के होती. डिसेंबरमध्ये दोन्ही कंपन्यांची सामूहिक हिस्सेदारी 30 टक्क्यांवर राहिली. डिसेंबरमध्ये टीव्हीएसचा वाटा 36 टक्क्यांपर्यंत खाली आला.
एकंदर विक्री 8 लाखाच्या घरात
कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये देशातील एकूण दुचाकींची विक्री ही दहा लाखाच्या आतच राहिली आहे. जवळपास 8 लाख 20 हजार वाहनांची विक्री झाल्याचेही समजते. 2023 मध्ये वर्षाच्या मध्यंतरी सबसिडी कमी करण्यात आल्याचा प्रतिकूल प्रभावासोबत विविध नियमावलीमुळे इलेक्ट्रिक कंपन्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. परिणामी या काळामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीवरही स्वाभाविकपणे नकारात्मक परिणाम दिसून आला. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये 6.1 लाख दुचाकी वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.
वृद्धीत टीव्हीएसची कमाल
2023 मध्ये कंपन्यांचा विकास पाहता ओला इलेक्ट्रिकने 2.4 पट वृद्धी नोंदवली आहे. अॅथर कंपनीने 2 पट, बजाज कंपनीने जवळपास तीन पट आणि टीव्हीएस कंपनीने एक वर्षात साडेतीन पट वृद्धी नोंदवली आहे. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये ओलाने जरी बाजारामध्ये आपली हिस्सेदारी बत्तीस टक्क्यांपर्यंत ठेवली असली तरी टीव्हीएस या कंपनीने मात्र 20 टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सेदारी प्राप्त करत बाजारात आपला दबदबा वाढवला आहे. परिणामी अॅथर कंपनीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.