ओला इलेक्ट्रीकला आयपीओ सादरीकरणास परवानगी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रीक दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओला इलेक्ट्रीकच्या आयपीओ सादरीकरणाला सेबीने मंजुरी दिली आहे. कंपनी सदरच्या आयपीओअंतर्गत 5500 कोटी रूपये उभारणार आहे.
ओलाने सादर केलेल्या अर्जाला सिक्युरेटी अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेवी) यांनी अखेर मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर भारतीय शेअर बाजारामध्ये आयपीओ सादरीकरण करणारी ओला ही पहिली इलेक्ट्रीक वाहन कंपनी असणार आहे. ताजे समभाग सादरीकरणासोबत ऑफर फॉर सेल अंतर्गत रक्कम उभारणीसाठी कंपनीचे प्रयत्न असणार आहेत.
कंपनीने 22 डिसेंबरला आयपीओ सादरीकरणासंदर्भात अर्ज रितसर सादर केला होता. ओला कंपनी आपले मुल्य 6 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे नियोजन करत आहे. ओला इलेक्ट्रीक सध्याला खर्चामध्ये कपात करण्याच्या योजनेवर भर देत असून नफा जास्तीत जास्त वाढविण्याकडेही कंपनीचे प्राधान्य असणार आहे. कंपनी आगामी काळामध्ये खर्चावर नियंत्रण मिळविण्यासाठी 600 जणांची कपात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत कंपनीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या 3733 इतकी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.