‘ओला’ने गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट
तब्बल 7 दिवसांमधील कामगिरी : 76 रुपयांवर सूचीबद्ध
मुंबई :
ओला इलेक्ट्रिक शेअर्सने 7 ट्रेडिंग दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. 9 ऑगस्ट रोजी कंपनीचे शेअर्स 76 रुपयांना बाजारात सूचिबद्ध झाले होते. मंगळवार 20 ऑगस्ट रोजी समभाग 157.53 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे.
तसेच 3.1 कोटी समभागांच्या ब्लॉक डीलनंतर ओलाचे शेअर्स आता 6 टक्क्यांपेक्षा जास्त खाली आले आहेत. 137 रुपयांच्या आसपास ट्रेडिंग होत आहे. या व्यवहाराचे मूल्य 468.3 कोटी आहे आणि शेअर्सचे व्यवहार सरासरी 146 प्रति शेअर या किमतीने झाले.
30 टक्के हिस्सेदारी अग्रवाल यांच्याकडे
कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल यांच्याकडे 30.02 टक्के हिस्सा आहे. भाविश अग्रवाल यांच्याकडे कंपनीचे 1,32,39,60,029 शेअर्स आहेत. 157.53 वर त्याचे मूल्य 20.85 हजार कोटी रुपये आहे. आयपीओच्या वेळी विक्रीच्या ऑफरद्वारे, अग्रवाल यांनी 76 रुपये प्रति समभाग दराने 37,915,211 शेअर्स विकले होते.
आयपीओदरम्यान नकारात्मकता तर होतीच पण लिस्टींग नरमाईत होऊनही नंतर मात्र समभागात तेजी दिसली आहे आणि ती कायम ठेवली. तेजी इतकी अधिक कशी काय दिसली याचे कारण मात्र कळू शकले नसल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे. एचएसबीसी या जागतिक ब्रोकरेज फर्मच्या मते ओलाचा आगामी काळातला विकास हा एकसमान नसणार आहे. फर्मने 140 रुपयांचा टप्पा समभाग गाठेल असे म्हटले होते, तो टप्पा कधीच कंपनीने पार केला होता.
तोट्यात झाली वाढ
एप्रिल-जून तिमाहीत ओलाला 347 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत कंपनीला 267 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. याचाच अर्थ तोट्यात अधिक वाढ दिसली आहे, जी कंपनीसाठी चिंता वाढवणारी आहे. म्हणजेच तूट 30 टक्के वाढली आहे. कंपनीचा महसूल 32 टक्के वाढत 1644 कोटी रुपयांवर पोहचला आहे. वर्षापूर्वी कंपनीने 1,243 कोटी रुपयांची कमाई केली होती.